पाटोदा : पावसाअभावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आता कर्ज वसुलीसाठी डीसीसी बँक १०१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई तात्काळ करावी, असे आदेश बँक प्रशासनाने येथील शाखाधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटोदा, अंमळनेर येथील शाखेतून अनेक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे कर्ज देण्यात आले आहे. पाटोदा शाखेची ४० शेतकऱ्यांकडे व्याजासह २१ लाख ८२ हजार रुपये तर अंमळनेर शाखेची १२ शेतकऱ्यांकडे १२ लाख ३९ हजार, पाचंग्री शाखेची दोघा शेतकऱ्यांकडे १ लाख ३२ हजार रुपये थकबाकी आहे. विविध कारणांसाठी बँकेतून या शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे कर्ज देण्यात आले होते. पाटोदा तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सतत पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनही हवे त्या प्रमाणात होत नाही. अशातच गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडलेला आहे. सध्या तब्बल महिन्यानंतर तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे. यामुळे शेतकरी पेरणीसह कपाशीची लागवड करू लागला आहे. अशा परिस्थितीत शेतकरीही आर्थिक अडचणीत आहेत. असे असले तरी डीसीसी बँकेने आता कर्ज वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांवर सहकार कायद्याच्या कलम १०१ नुसार कारवाई करण्याचे आदेश जिल्हा बँकेच्या प्रशासकांनी बँकेच्या येथील शाखेस दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आता दुष्काळात तेरावा महिना आला आहे. जिल्हा सहकारी बँकेचे राजकीय वरदहस्त असलेले काही थकबाकीदारांकडेही लाखो रुपयांची थकबाकी आहे. अशा लोकांवर कारवाई करून कर्जाची सक्तीने वसुली करावी. मात्र मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडून सध्या सक्तीने वसुली करू नये व त्यांच्यावर कारवाईही करू, नये, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णूपंत घोलप यांनी केली आहे.सध्या शेतकऱ्यांकडे मशागतीसह बियाणे खरेदी, खत खरेदी, लागवड यासाठीही पुरेसे पैसे नाहीत. तसेच अनेक शेतकऱ्यांना अद्यापही गारपीट अनुदान, पीक विमा याचे पैसे मिळाले नाहीत. यामुळे शेतकरी चोहूबाजूंनी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत बँकेने मध्यम मुदतीचे कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज व पीक कर्ज याची सक्तीने वसुली करू नये व त्यासाठी कायदेशीर कारवाईही करू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कॉ. महादेव नागरगोजे यांनीही केली आहे. पाटोदा येथील बँकेचे व्यवस्थापक कैलास इंगळे म्हणाले की, शेतकऱ्यांकडील वसुली संदर्भात पत्र व्यवहार सुरू आहे. शेतकऱ्यांकडून कशा प्रकारे वसुली करायची या संदर्भात काय आदेश आहेत याची माहिती निरीक्षक बेदरे यांच्याकडे असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांकडील पैशा संदर्भात सहायक निबंधक आर.बी. कातळे म्हणाले की, ५४ शेतकऱ्यांकडे ५५ लाख ८९ हजार रुपयांची थकबाकी आहे.या संदर्भात संबंधित शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून निर्णय घेतला जाईल. असे असले तरी बँकेत सध्या सक्त वसुली करण्या संदर्भात लगबग सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)५४ शेतकऱ्यांकडे ५५ लाखांचे कर्जपाटोदा, अंमळनेर, पाचंग्री येथील डीसीसीच्या शाखेतून शेतकऱ्यांनी घेते आहे कर्ज.पेरणीसह मशागतीचा काळ असल्याने शेतकरी आहेत आर्थिक अडचणीत. गेल्या वर्षीही शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट.अशा परिस्थितीत सध्या कर्ज वसुलीसाठी बँकेने कारवाई करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी.
वसुलीसाठी जिल्हा बँक कारवाईच्या पवित्र्यात
By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST