औरंगाबाद : महोत्सव घेण्याची ख्याती असलेल्या राज्य पर्यटन महामंडळाला पर्यटन राजधानीतच वेरूळ अजिंठा महोत्सवातील सातत्य राखण्यात अपयश आले आहे. पर्यटनवाढीचा मुख्य उद्देश असलेल्या महोत्सवाचा पर्यटनवाढीच्या दृष्टीने कोणताही विचार न झाल्यामुळे, तसेच एकेकाळी पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोहोचलेला हा महोत्सव सरकारी अनास्थेच्या कचाट्यात सापडला आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी जगप्रसिद्ध वेरूळ लेण्याच्या नावाने सुरू झालेल्या या महोत्सवाचा मुख्य उद्देश पर्यटनवृद्धी असाच होता, अशी माहिती या महोत्सवाशी सुरुवातीपासून संबंधित असलेल्या पर्यटन आणि इतिहासाचे अभ्यासक रफत कुरेशी यांनी सांगितले. मात्र, या उद्देशात आपण तीस वर्षांनंतरही सफ ल झालो असे म्हणता येत नाही. हे आपल्या पर्यटन राजधानीचे दुर्दैव म्हणावे लागेल. मागील वर्षी महोत्सव का झाला नाही, हे कळलेच नाही. यंदा मोठ्या कलावंतांच्या तारखा मिळणे अवघड आहे. त्यामुळे हा महोत्सव होणे कठीण दिसत आहे. इतिहासाच्या अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी म्हणतात की, ज्या उद्देशाने हा महोत्सव सुरू झाला त्याचा उद्देश सफल व्हायला पाहिजे. परदेशी पर्यटक, तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, असा उद्देश होता. वेरूळ येथे होत असलेला महोत्सव गैरसोयीचा ठरत होता म्हणून हा महोत्सव औरंगाबादेत आणण्यात आला. सुरुवातीला साधारणत: तीस लाख रुपयांमध्ये हा महोत्सव होत असे. काही उद्योजकही पुढे आले त्यामुळे ते सुसह्य बनले. देश- विदेशातील कलावंत येथे येतात त्यांची कला पाहायची संधी यानिमित्ताने मिळते. मुळात वेरूळ येथून हा महोत्सव औरंगाबादेत आणल्यानंतर व्ही. राधा जिल्हाधिकारी असताना तो तीन वर्षे सतत चालला. नंतर पुन्हा मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या हल्ल्यामुळे हा महोत्सव खंडित झाला. २०१२ साली तो पुन्हा सुरू झाला. मात्र, तो एका वर्षापुरताच. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव ज्या उत्साहाने आणि शिस्तीने अखंडितपणे चालू आहे. त्याच धर्तीवर हा महोत्सव चालू राहायला पाहिजे, अशी शहरातील कलावंतांची अपेक्षा आहे.
वेरूळ महोत्सवाचा उद्देशच हरपला
By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST