जालना : जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये चौरंगी, पंचरंगी अशी अटीतटीची लढत होत आहे. प्रचार संपण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्व प्रमुख उमेदवारांनी मतदारसंघांतील शहरांमध्ये पदयात्रा, कॉर्नर बैठका, छोट्या सभा, मोठ्या सभांवर भर दिला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. जवळपास उमेदवारांनी सुरूवातीला ग्रामीण भागातील प्रचारावर भर दिला. पदयात्रा, बैठका, सभांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. महिला पदाधिकाऱ्यांनीही या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीमय वातावरण झालेले असल्याने चौकाचौकात, गल्लीबोळात, घराघरात सध्या निवडणुकीविषयीच्या चर्चेने रंग भरू लागला आहे. प्रमुख पक्षांसह अपक्षांच्या फेऱ्यांमध्येही युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. या निवडणुकीत युती आणि आघाडी नसल्याने प्रत्येक मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची संख्या वाढल्याने लढतीला चौरंगी, पंचरंगी स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने ही निवडणूक म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याची चर्चा पाचही मतदारसंघांमध्ये सुरू आहे. परिणामी उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती हिरारीने प्रचारांमध्ये गुंतलेले आहेत. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. सकाळी रस्त्यारस्त्यांवर ध्वनिक्षेपक वाहनांद्वारे किंवा पदयात्रांद्वारे राजकीय पक्षांचे जत्थेच्या जत्थे प्रचारात दिसत आहेत. दुपारी छोट्या किंवा मोठ्या सभा, सायंकाळी कॉर्नर बैठका तसेच सायंकाळनंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीने हॉटेल्स, ढाबे गजबजल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात प्रचारफेऱ्यांनी शहरे गजबजली
By admin | Updated: October 12, 2014 00:38 IST