वाळूज महानगर : बजाजनगर-पंढरपूर परिसरातील ३ हजार ग्राहकांकडे जवळपास १ कोटीचे वीज बिल थकीत आहेत. या थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणच्या बजाजनगर शाखा वाळूज शहर उपविभागातर्फे जनजागृती रॅली काढून थकीत देयके भरण्याचे आवाहन केले जात आहे.
महावितरणच्या बजाजनगर उपविभागाअंतर्गत बजाजनगर व पंढरपुरात जवळपास ९ हजार वीज ग्राहक आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे बजाजनगर, पंढरपूर आदी भागातील अनेक ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केलेला नाही. या भागातील जवळपास ३ हजार ग्राहकांकडे १ कोटी रुपयाची वीज बिले थकीत आहेत. थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून ग्राहकांना अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. मात्र ग्राहक वीज बिले भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणच्यावतीने ‘एक गाव-एक दिवस’ ही मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत वीज ग्राहकांचे प्रलंबित प्रश्न तसेच थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी गावात जाऊन नागरिकांत जनजागृती करीत आहे. या अभियानाअंतर्गत महावितरणच्यावतीने पंढरपुरातील तिरंगा चौकातून मंगळवार (दि.५)रॅली काढण्यात आली. मुख्य रस्त्यावरुन ही रॅली काढून गावात विविध वार्डात रॅली नेऊन ग्राहकांना वीज बिले भरण्याचे आवाहन करण्यात आले. सदोष देयकासंदर्भात तक्रारी असल्यास तक्रारीचे निराकारणही करुन थकीत बिलाचे सुलभ हप्तेही पाडून दिले जात आहे. अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ, कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी, सहाय्यक अभियंता राजेंद्र राठोड, जितेंद्र मालुसरे, संभाजी आथरगन व वाळूज उपविभागातील कर्मचारी आदींच्या उपस्थितीत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
फोटो ओळ- बजाजनगर-पंढरपूर परिसरात थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून जनजागृती रॅली काढण्यात आली.
----------------------