उस्मानाबाद : येणाऱ्या पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होवू नये, साथरोग उद्भवू नये, तसेच ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ‘साथरोग मुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांनी दिली.२५ मे ते १५ जून या कालावधीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पाणी गुणवत्तेच्या विषयावरील प्रबोधन करणाऱ्या मुद्रीत साहित्यासह जिल्हाभर गृहभेटीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गटसंसाधन केंद्रातील गटसमन्वय, समुहसमन्वयक व उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार हे कोपरा बैठका घेऊन गावा-गावातील भजनी मंडळ, युवक मंडळ, महिला बचत गट तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून जनजागृती करणार आहेत. यावेळी पाणी गुणवत्तेच्या विषयावरील लघुपटही दाखविण्यात येणार असल्याचे तुबाकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोहीम कालावधीमध्ये १ ते ५ जून हा पहिला टप्पा असून, ६ ते १० जून दुसरा आणि ११ ते १५ अशा तिसऱ्या टप्प्यात सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी २९ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही तुबाकले यांनी दिली.
स्वच्छ पाण्यासाठी जनजागृती मोहीम
By admin | Updated: May 27, 2015 00:39 IST