उदगीर : उदगीर शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या नांदेड-बीदर रस्त्यास केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी दिली आहे़ त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३८५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती शुक्रवारी आमदार सुधाकर भालेराव यांनी दिली़ नांदेड व बीदरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उदगीरला या महामार्गाचा मोठा लाभ होणार आहे़ गुरु-ता-गद्दीच्या वेळी नांदेड-बीदर रस्त्याचे काम उदगीर मार्गे होईल, असे उदगीरकरांना अपेक्षित होते़ मात्र, ऐनवेळी हा मार्ग नांदेड-देगलूर-संतपूर मार्गे बीदरला जोडण्यात आला़ त्यामुळे अहमदपूर, उदगीरकरांचा हिरमोड झाला़ दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी उदगीर येथील जाहीर सभेत उदगीरला राष्ट्रीय महामार्गावर आणण्याचे आश्वासन दिले होते़ त्याअनुषंगाने नांदेड-बीदर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करुन त्यांनी आश्वासन पाळल्याचे आमदार सुधाकर भालेराव यांनी सांगितले़ या १२८ किलोमीटर अंतराच्या महामार्गास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, त्यासाठी ३८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ लवकरच या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होवून तो पूर्णत्वास गेल्यानंतर उदगीर शहरातील वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत होईल, अशी आशा आमदार सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केली़ (वार्ताहर)
नांदेड-बीदर मार्गास ३८५ कोटींची तरतूद
By admin | Updated: December 19, 2015 23:48 IST