व्यंकटेश वैष्णव , बीडलोकभावना लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते, पक्ष, संघटना दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलने करतात. यातून प्रश्नांची उकल होण्यास मदत होते. प्रश्न मार्गी लागतात, लागलेले आहेत. मात्र आता पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने गणेशोत्सवाचे कारण पुढे करत आंदोलने करण्यालाच मज्जाव केला आहे. मंगळवारी जिल्हा माहिती कार्यालया अंतर्गत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून जिल्हयात विविध ठिकाणी (मनाई आदेश) प्रतिबंधात्मक आदेश लागू करून तुघलकी कारभाराचा प्रत्यय दिला आहे.बीड जिल्हा हा चळवळींचे उगमस्थान आहे. बीडचे माजी खा. क्रांतीसिंह नाना पाटील हे बीडचे खासदार असताना शेतकऱ्यांवरील कर्जासाठी संसदेवर बैलगाडी मोर्चा काढून ‘फिटले म्हणा’ चा नारा दिला होता. याचा विसर आताच्या शासन व प्रशासनाला पडत असल्याचा प्रत्यय मंगळवारी आला. १७ ते २८ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवाचे कारण पुढे करत जिल्हा प्रशासनाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकाच्या सुरूवातीलाच दुष्काळी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांमुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडून मोठा अनर्थ होईल, अशा अर्थाने जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे.जिल्हयात गेल्या पावसाळ्या अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. अशा स्थितीत शासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी विविध राजकीय पक्ष, संघटना आंदोलने करत आहेत. ही आंदोलने दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सरकारवरचा रोष आंदोलनांमधून कार्यकर्ते व्यक्त करत असतानाच गणेशोत्सवाचे कारण पुढे करून जिल्हयात मनाई आदेश जारी केला आहे. लोकभावना लक्षात घेवून आंदोलने करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने काढलेल्या फतव्यामुळे आंदोलनाच्या अधिकारावरच टाच आली असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत काढलेल्या या आदेशाने संताप व्यक्त होत आहे.
दुष्काळ प्रश्नांवरील आंदोलनांना मनाई
By admin | Updated: September 16, 2015 00:03 IST