उमरगा : नगर परिषदेची दोनवेळा तहकूब झालेली विशेष सभा गुरूवारी बोलावण्यात आली होती. परंतु, सत्ताधाऱ्यांनीच सभेतील विषयावर चर्चा करण्यास आणि ठरावाला मंजुरी देण्यास विरोध केला. ही सभा दोन महिन्यांसाठी तहकूब करावी, असे पत्र दिले. याच मागणीवर सत्ताधारी दिवसभर ठाम होते. तर दुसरीकडे काँग्रेस सदस्य चर्चेसाठी आक्रमक दिसून आला. या गोंधळी वातावरणात कुठलाही निर्णय झाला नाही.नगर परिषदेच्या सभागृहामध्ये गुरूवारी नियोजित वेळेनुसार नगराध्यक्ष केवलबाई औरादे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. यावेळी जवळपास सर्व सदस्य उपस्थित होते. सभेतील विषयांवर चर्चेला सुरूवात होताच सदस्यांनी विरोध करण्यास सुरूवात केली. चर्चा न करता ही सभा दोन महिन्यांसाठी तहकूब करावी असा आग्रह त्यांनी धरला. ही मागणी मान्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी थेट लेखी पत्र पिठासीन अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, सत्ताधारी चर्चेला विरोध करीत असताना काँग्रेसचे सदस्य मात्र, ‘चर्चा व्हावी’ म्हणून आग्रह धरत होते. दरम्यान, वारंवार विनंती करूनही गोंधळ कमी होण्याची चिन्हे नसल्याने अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगराध्यक्षा औरादे यांनी ‘सत्ताधारी सदस्यच सभा घेवू देत नाहीत’, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना ‘फॅक्स’ केले आणि त्यांनी सभागृह सोडले. नगराध्यक्षा सभागृहाबाहेर गेल्यानंतर काँग्रेस सदस्यही निघून गेले. दरम्यान, अध्यक्षा आणि काँग्रेसचे सदस्य सभागृहाबाहेर गेल्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष धनंजय मुसांडे यांना सभेचे अध्यक्षपद देवून सभा चालू ठेवली. यावेळी पाणीप्रश्नासह इतर दहा ठरावांना मंजुरी देण्यात आली.
सत्ताधाऱ्यांनी केला चर्चेला विरोध !
By admin | Updated: September 4, 2015 00:34 IST