लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यात विजेचा तुटवडा असल्याने अनेक शहरांमध्ये महावितरणतर्फे सक्तीने भारनियमन करण्यात येत आहे. शहरात मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनतर्फे (एमआयएम) भारनियमनाच्या विरोधात शुक्रवारी दुपारी मिलकॉर्नर येथील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चातील काही नेते व कार्यकर्त्यांनी चक्क महावितरण कार्यालयावर दगडफेक केली. अधिका-यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील काही कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या दालनाची तोडफोड केली.राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने अनेक शहरांमध्ये भारनियमन सुरू करण्यात आले आहे. औरंगाबादेतही ९ तास भारनियमन सुरू असल्याने या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारच्या नमाजनंतर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्यात आले. आ. जलील यांच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी चार वाजता मोर्चा मिलकॉर्नर येथील कार्यालयावर पोहोचला. उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर जमावातील काही तरुण कार्यालयात शिरले. त्यांना सुरक्षारक्षकांनी अडविण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी महावितरणच्या विविध जाहिराती व माहिती देणारे फलक तोडून टाकले, दगडफेक करून इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या.संतप्त कार्यकर्ते मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या दालनात पोहोचले. यावेळी गणेशकर कार्यालयात नव्हते. कार्यकर्त्यांनी दालनात घुसण्यापूर्वी बाहेरच्या दरवाजाच्या काचा फोडल्या. यामध्ये एका नगरसेविका पतीच्या पायाला जोरदार जखम झाली. कार्यालयातून रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. एमआयएम कार्यकर्त्यांचा संताप कमी होत नव्हता. विजेअभावी औरंगाबादकर तडफडत असताना वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी एसीमध्ये बसतात कसे, असे म्हणतच, गणेशकर यांच्या दालनातील एसी तोडला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत टेबलवरची काच फोडली. यावेळी दिसेल त्या फर्निचरची तोडफोड करण्यात येत होती. बराच वेळ कार्यकर्ते कार्यालयातच घोषणा देत होते. यावेळी महावितरणचे अधिकारी समजूत घालण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
एमआयएमकडून तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:47 IST