गजानन दिवाण । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सारोळा परिसरातील राखीव वनक्षेत्रात गतवर्षी लावण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी चक्क बाजूचीच झुडपे तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जी झुडपे तोडली तीही राखीव वनक्षेत्रातीलच असल्याने वन कायदा कलम २६ अंतर्गत वन कर्मचाऱ्यांनीच गुन्हा केल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’ने सोमवारी ‘कुंपणच वन खातेय’ ही बातमी प्रसिद्ध करताच उपवनसंरक्षक सतीश वडसकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मिशन जोरात सुरू असताना औरंगाबादपासून साधारण २५ कि.मी. अंतरावर असलेल्या या सारोळा जंगलात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल तोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी पक्षीमित्र पंकज शक्करवार, रूपाली शक्करवार आणि अश्विनी मोहरीर यांनी उघडकीस आणला. ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी दुपारी प्रत्यक्ष या ठिकाणाची पाहणी केली. खुलताबाद वनाची हद्द संपते तेथून सारोळा गावाच्या दिशेने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गतवर्षी वृक्षारोपण मोहिमेत तब्बल १२०० झाडे लावण्यात आली होती. त्या झाडांना गेल्या तीन दिवसांपासून दोन वन कर्मचाऱ्यांच्या निगराणीत कुंपण घालण्याचे काम केले जात आहे. यासाठी चार मजूर काम करीत आहेत. वन कायदा कलम २६ अंतर्गत राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड, खोदकाम, साफसफाई, आग लावणे हा गुन्हा समजला जातो. सारोळा जंगलदेखील राखीव वनक्षेत्र असताना त्यातील झुडपे तोडून या झाडांना कुंपण घातले जात आहे. साधारण आठ ते दहा ट्रॅक्टर भरतील इतकी झुडपे या तीन दिवसांत तोडली असल्याचे प्रत्यक्ष तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तोडलेल्या झुडपांचे कुंपण करा. नव्याने तोडू नका, असे आदेश साहेबांनी दिल्याचे एका कामगाराने सांगितले. साधारण पाचशे झाडांना कुंपण लावण्यात आले असून, प्रत्येक कुंपणाला आठ ते दहा फांद्या लावल्या आहेत. याचा अर्थ पाचशे झाडांसाठी किमान निम्मे म्हणजे अडीचशे झुडपांवर वनविभागाच्या परवानगीनेच कुऱ्हाड चालविली गेली आहे. पक्ष्यांचा घरटी करण्याचा आणि अंडी घालण्याचा हाच हंगाम आहे. बाभळीच्या जंगलात बुलबुल घरटी घालते, करवंदाच्या जंगलात वटवट्या हा पक्षी घरटी घालतो, तर आमटी-करवंदाच्या फळांचा हाच कार्यकाळ असून, पक्ष्यांचे ते प्रमुख खाद्य आहे. या क्षेत्रात हेच झुडपी जंगल आहे. ज्या झुडपांची कटाई करण्यात आली त्यावरही पक्ष्यांची घरटी दिसली. सारोळा परिसरात पक्ष्यांच्या साधारण १६० प्रजाती आढळतात. यातील जवळपास २० टक्के पक्षी कटाई झालेल्या क्षेत्रात आढळतात. बटेर, तितर आणि मोर या सारख्या पक्ष्यांसाठी हा परिसर ओळखला जातो. या कटाईमुळे त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे.
राखीव वनक्षेत्रातीलच झुडपे तोडली!
By admin | Updated: July 4, 2017 00:06 IST