औरंगाबाद : आमखास मैदान येथील विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलसाठी सुधारित आकृतिबंधानुसार २०६ पदांचा प्रस्ताव मंत्रालयाच्या लालफितीत अडकला आहे. एवढेच नव्हे तर निवासी डॉक्टरांसाठी अत्यल्प १४ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आल्याने ७६ निवासी डॉक्टरांनी कॅन्सर हॉस्पिटलकडे पाठ फिरविली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्यातील पहिले शासकीय कॅन्सर हॉस्पिटल आमखास मैदान येथे उभारण्यात आले. रुग्णांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली अॅडमिट ठेवावे लागते. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी शासनाने निवासी डॉक्टरांची ७२ पदे मंजूर केलेली आहे. डॉक्टरांचे मानधन ३० हजार ते ४० हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे शासनाने निश्चित केलेले आहे. मात्र, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नियुक्त करावयाच्या निवासी डॉक्टरांना दरमहा केवळ १४ हजार रुपये मानधन देण्याचे ठरविण्यात आलेले आहे. त्यामुळे डॉक्टर फिरकत नाहीत.मानधन वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावाराज्यातील अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांप्रमाणे कॅन्सर हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांना मानधन मंजूर करावे, यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू असल्याचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. जोपर्यंत सुधारित मानधन उपलब्ध होत नाही, तोपर्यंत निवासी डॉक्टर मिळणे अशक्य आहे.
कॅन्सर हॉस्पिटलच्या २०६ पदांचा प्रस्ताव मंत्रालयात अडकला
By admin | Updated: June 23, 2014 00:33 IST