मंजुरीस टाळाटाळ : बारा-पंधरा दिवसाला तोही तोकडा पाणीपुरवठापरंडा : बुडक्याच्या आधारावर विसंबून असलेला शहराचा पाणीपुरवठा शेवटच्या घटका मोजत आसल्याने ऐन उन्हाळ्याच्या मध्यावर शहरातील पाणी टंचाईने रौद्ररुप धारण केले आहे. यावर मात करण्यासाठी पालिकेकडून महिनाभरापूर्वी टँकर व नवीन बुडक्या घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला असून, जिल्हा प्रशासनाकडून मात्र अद्याप याला मंजुरी मिळाली नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.सीना-कोळेगाव धरणातील पाणीसाठा जवळपास संपुष्टात आला असून, सीना जॅकवेल परिसरातील बुडक्या शेवटची घटका मोजत असल्याने शहाराला आजमितीस बारा ते पंधरा दिवसाला पाणी पुरवठा केला जात आहे. तोही तोकडया खरूपात असल्याने शहरवाशीयांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका समर्थनगर, झोपडपट्टी, शिक्षक सोसायटी, आदर्शनगरसह देवगांव रोड परिसराला बसत आहे. मध्यंतरी या परिसरातील महिलांनी माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना घेरावो घालण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु, पर्यायच उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासन हतबल झाल्याचे यावेळी दिसून आले.सद्यस्थितीत सीनाकोळेगाव प्रकल्प परिसरातील जलस्त्रोतातून प्रतिदिन ५० हजार लिटर पाणी प्राप्त होत असून, सीना जॅकवेल परिसरातील बुडक्यातून ७० हजार लिटर पाणी असे एकूण १ लाख २० हजार लिटर पाणी उपलब्ध होते. उपलब्ध पाण्यावर २५ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या परंडा शहरात झोन विभागनिहाय पध्दतीने दर बारा ते पधरा दिवसाला तोकड्या स्वरूपात पाणी पुरवठा होत असल्याने हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन यांच्या उर्स उत्सवातही शहरवाशीयांना भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.दरम्यान, परंडा शहराची भिषण पाणी टंचाई व सीना कोळेगाव प्रकल्प क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या विहीरी उचक्या देत असल्याने पालिका प्रशासनाने सीना जॉकवेल परिसरातील सीना नदीपात्रात बुडक्या खोदल्या होत्या. तर पुढील पाणी टंचाईचे गांभिर्य ओळखून २० टँकरच्या प्रस्तावासह सिनाकोळेगाव प्रकल्प परिसरात नव्याने बुडक्या घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. मात्र हे प्रस्ताव गेल्या महिण्याभरापासून कार्यालयात धूळखात पडून आहेत. प्रशासनाने प्रस्तावास मान्यता न दिल्याने पालिका प्रशासनही उपाय योजना करण्यात हतबल झाले आहे. (वार्ताहर)मागील महिन्यात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आले असताना त्यांनी शहराच्या पाणीटंचाईची समस्या जाणून घेतली होती. पालिका प्रशासनाने भूम तालुक्यातील नांदगाव धरणातून २० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव देसाई यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावास शासनस्तरावर तात्काळ मान्यता दिली जाईल असे आश्वासन देसाई यांनी दिले होते. मात्र, या आश्वासनाची अद्यापही पूर्तता झालेली नाही.सीनाकोळेगाव धरणातील जलस्रोत निकामी होत असल्याने परिसरात नव्याने बुडकी घेण्यासंबधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. गेल्या मार्च महिन्यात २० टँकरचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. परंतु, अद्याप प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता स्वप्नील ओहाळ यांनी सांगितले.
पालिकेकडून बुडक्या, टँकरचा प्रस्ताव
By admin | Updated: April 15, 2016 00:49 IST