बीड : येथील जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे अपंग कल्याण आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय २०० वर कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याचा प्रकार समोर आला आहे.अपंग कल्याण आयुक्तांच्या परवानगीशिवाय खाजगी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती व वाढीव वेतनश्रेणीचा लाभ देता येत नाही; मात्र संस्थाचालक व अधिकाऱ्यांच्या संगनमताने गेल्या काही वर्षांत २०० कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय पदोन्नती देण्यात आली आहे. दुसरीकडे शहरातील मतिमंद विद्यालयातील सफाई कामगार अरुणा तुरुकमारे यांची शिपाई पदाची संचिका मात्र पदोन्नती बहाल केल्यानंतर वेतनश्रेणीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आली. त्यामुळे तुरुकमारे यांच्यावर मागील सहा महिन्यांपासून वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.तुरुकमारे यांना एक, तर इतरांना दुसरा नियम का, असा सवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केला आहे. यासंदर्भात समाजकल्याण अधिकाऱ्यांसह सामाजिक वैद्यकीय कार्यकर्ता व इतर कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी शनिवारी अतिरिक्त सीईओंकडे निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात अतिरिक्त सीईओ धनराज नीला यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. (प्रतिनिधी)
पूर्वपरवानगीशिवाय पदोन्नतीची खिरापत
By admin | Updated: February 5, 2017 23:26 IST