किनवट : जि़ प़ शाळेत प्राथमिक शिक्षणाचा दर्जा खालावू नये तसेच विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी गटशिक्षणाधिकारी डी़ जी़ दवणे यांनी तालुकास्तरीय गुणवत्ता पथकाची निर्मिती केली आहे़ जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होवू नये व शैक्षणिक गुणवत्ता टिकून रहावे यासाठी शिक्षकांनी चोख कर्तव्य बजवावे यावर हे पथक नियंत्रण ठेवणार आहे़ याबरोबरच भेटीत तपासणी पथक शालेय अभिलेखे, भौतिक सुविधा, मूल्यमापन पद्धती व शालेय गुणवत्तेची तपासणी करुन अहवाल सादर करणार आहे़ शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या पथकात केंद्रप्रमुख आऱ आऱ जाधव, चंद्रशेखर सर्पे, राठोड, कांबळे यांचा समावेश आहे़ माळबोरगाव केंद्र व मारेगाव येथे भेट दिली़ उशिरा येणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व अनुपस्थित राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस या पथकाने बजावली आहे़ इयत्ता पहिली ते चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, गणितीय क्रिया, इंग्रजीचे ज्ञान, शालेय शिस्त या बाबींची पाहणी पथक करीत आहे़ आदिवासी, डोंगराळ अतिदुर्गम भागातील जि़ प़ च्या शिक्षणाचा दर्जा समाधानकारक असल्याचे पथकाच्या निदर्शनास आलयाचे सांगितले़ गटशिक्षणाधिकारी डी़ जी़ दवणे हे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी व विद्यार्थ्यांची गळती थांबावी यावर विशेष भर देत आहेत़ तपासणी पथकाच्या अचानक शाळा भेटीने दांड्या मारणाऱ्या शिक्षकांनी धास्ती घेतली आहे़ (वार्ताहर)
किनवट तालुक्यात गुणवत्ता पथकाची निर्मिती
By admin | Updated: August 24, 2014 23:48 IST