लातूर : पिण्याच्या पाण्यानंतर शेती व शेतीनंतर उद्योगाला पाणी द्यावे, असे नियोजन असतानाही महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यानंतर उद्योगाला पाणी देण्याची भाषा केली जात आहे़ उद्योगापूर्वी शेतीलाच पाणी दिले पाहिजे, असे मत जलतज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी येथे रविवारी व्यक्त केले़ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्रात लातूरच्या वतीने शेती व शेतीचे भविष्या या विषयावरील आयोजित परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी खा़डॉ़जनार्दन वाघमारे होते़ मंचावर माजी आ़ पाशा पटेल, शेतकरी नेते विजय नावंदिया, अमर हबीब, लक्ष्मण वांगे, माजी न्यायमूर्ती विजयकुमार बोडके पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, प्राचार्य दर्शना देशमुख आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोराडे म्हणाले, पाणीटंचाईमुळे पाण्याची पळवापळव सुरु झाली आहे़ तुम्ही उजनीच्या पाण्यासाठी पाठपुरावा करीत आहात़ तर आम्ही भंडारदऱ्याच्या पाण्यासाठी भांडतो आहोत़ यातून शेतकऱ्यांचीच माती होते़ यापुढील कालावधीत अशीच परिस्थिती राहिली तर प्रसादाप्रमाणे पाणी मिळेल़ त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी़ शासनाला काजुची शेती चालते, ऊसाची दारु चालते, मग गांजाची शेती का नको, असा सवालही त्यांनी केला़ पुढील ११ वर्ष पर्जन्यमान असेच राहील, असे भाकितही त्यांनी वर्तविले़ शेती आणि जनावरांची सांगड आपण सोडली आहे़ हार्वेस्टींग मशीनद्वारे हल्ली आपण राशी करीत आहोत़ त्यामुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली आहे, असेही बोराडे म्हणाले़अध्यक्षीय समारोपात बोलताना माजी खा़जनार्दन वाघमारे म्हणाले, शरद पवारांचे सर्व आयुष्य शेतकऱ्यांसाठी गेले आहे़ चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना मराठवाड्याला करावा लागत आहे़ मराठवाड्याचा दुष्काळवाडा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी टिकेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे़ म्हणून शासनाबरोबर आपणही शेतीसाठी काहीतरी करणे गरजेचे आहे़ यावेळी माजी आ़ पाशा पटेल, शेतकरी नेते विजय जावंदिया, लक्ष्मण वंगे आदींनीही विचार मांडले़ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी केले़ तर आभार अॅड़ मनोहरराव गोमारे यांनी मानले़
उद्योगाला नव्हे शेतीच्या पाण्याला प्राधान्य द्या
By admin | Updated: December 28, 2015 00:20 IST