जालना : गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळामुळे सर्वच डाळींचे कमालीचे भाव वाढले होते. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तुरीचे पीक समाधानकारक आल्याने सर्वसामांन्याच्या ताटातून गायब झालेली डाळ पुन्हा दिसत आहे. दर कमी झाल्याने सामान्यांतून दिलासा आहे.जालना मार्केट तूर, मूग आणि चनाडाळीसाठी प्रसिध्द आहे. फेब्रवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात तूरडाळीची आवक वाढत असते. परंतु यंदा मात्र जिल्हात मुबलक पाऊस पडल्याने तुरीची आवक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू झाली आहे. गेल्या वर्षी १५ ते १६ हजार रूपये प्रतिक्विंटल मिळणारी तूरडाळ ६५०० रूपये प्रतिक्विंटलवर आली आहे. परिणामी १६० रूपये प्रति किलोने मिळणारी तूरडाळ ठोक भावात ६१ रूपये किलो तर किरकोळ भावात ८० रूपये किलो मिळू लागल्याने सर्वसामान्यांनी डाळ खरेदीकडे कल दिसून येत असल्याचे दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पंच म्हणाले. मूगडाळ पचण्यास हलकी असल्याने तूर डाळीसह मुगाच्या डाळीला चांगली मागणी वाढली आहे. लग्न समारंभासाठी अनेकजण आत्तापासून तूरडाळ खरेदी करून ठेवत आहेत.तूरडाळ, उडीद, मूग चनाडाळ, मसूर आदी प्रमुख डाळीचे भाव कमी झाले आहेत. मागच्या वर्षी या सर्वच डाळीच्या भाव गगणाला भिडल्याने सर्वसामांन्याच्या आहारातून डाळी गायब झाल्या होत्या. यंदा मात्र मुबलक पावसाने सर्वच कडधान्याचे पीक मुबलक आल्याने बाजारात विविध डाळींचे दर घसरले आहेत. जिल्ह्यात ३० दालमिल आहेत. त्यापैकी २० दालमिल सुरू आहेत. दालमिल मध्ये दररोज ८ हजार क्व्ािंटल तुरीची आवक होत असून साडेतीन हजार क्विंटल डाळ तयार होत आहे. जिल्ह्यातील डाळीला मुंबई, ठाणे पुणे,आंध्रप्रदेश आदी ठिकाणाहून मोठी मागणी असल्याचे पंच म्हणाले. सध्या तुरीची आवक वाढत असल्याने तुरीच्या डाळीचे भाव आणखी कमी होतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत.
डाळीचे दर सामान्यांच्या आवाक्यात
By admin | Updated: January 23, 2017 23:42 IST