हिंगोली : आजघडीला शेतकऱ्यांपाशी मालच नसल्याने गुरूवारी ५ हजारांवर गेलेला तुरीचा दर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या पदरात पडला. हंगाम येताच भाव घसरण्याची परंपरा कायम राहिल्याने शेतकऱ्यांच्या मालास समाधानकारक दर मिळत नाहीत. बाजारात केवळ १०० क्विंटल तुरीची आवक होती. हिंगोली जिल्हा पांढऱ्या सोन्याच्या पिकाचा म्हणून ओळखला जातो. कापसात तुरीचे अंतरपीक सर्रास शेतकरी घेतात. शिवाय नगदी पीक म्हणूनही तुरीकडे पाहणारे शेतकरी आहेत. गतवर्षी ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड झाली होती. यंदा त्यात घट होऊन २७ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते. शेतकऱ्यांनीही तुरीला दूर लोटल्याने २३ हजार हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आले. यंदा केंद्र सरकारने तुरीला ४ हजार ३५० रूपयांचा दर जाहीर केला. त्यातच गुरूवारी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला चांगला भाव मिळाला. सकाळी ४ हजार ४३३ रुपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ होऊन ५ हजार ४७ रुपयांपर्यंत कमाल दर गेला. दरात तेजी आली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही. बाजारात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच अधिक माल असल्याने वाढीव दराचा फायदा शेतकरीवर्गास झाला नाही. (प्रतिनिधी)
तुरीचा भाव पाच हजारांवर
By admin | Updated: September 19, 2014 00:27 IST