औरंगाबाद : विधानसभेचा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा बांधील नसतो. त्याला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवावे लागतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज येथे केले व राजकीय प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले. त्यांच्यावर ते भाजपाचे म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस सरकार वाचवल्याचा आरोप होत होता. त्या पार्श्वभूमीवर हरिभाऊ हळूहळू स्वत:ला सावरत असल्याचे दिसून आले.जिल्हा मराठी पत्रकार संघाने दुपारी आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’मध्ये हरिभाऊंचा सत्कार करण्यात आला. यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली; पण राजकीय प्रश्नांना मात्र उत्तरे देण्याचे टाळले. ‘हळूहळू का होईना मराठवाड्याची अस्मिता जागवणार, कायद्यानुसार जायकवाडीला मिळावयाचे पाणी मिळालेच पाहिजे, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाची भरीव मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार, अशी आश्वासनेही त्यांनी यावेळी दिली.औरंगाबादला विधानसभेचे अधिवेशन होणार का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, औरंगाबादला खंडित झालेली मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, असा एक विचार आहे. मात्र, अधिवेशनालाबद्दल काही सांगता येणार नाही. बैठका, अधिवेशन यापेक्षा निधी किती मिळाला याला महत्त्व आहे.विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी नेमके काय घडले, आवाजी मत म्हणजे काय, अब्दुल सत्तार वगैरेंना जाणूनबुजून निलंबित केले गेले, विधानसभेत सत्तारूढ पक्षाचे आमदारही गोंधळ घालतात, त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती हरिभाऊ बागडे यांच्यावर करण्यात आली; परंतु ‘मला आता या विषयावर काहीच बोलायचे नाही,’ असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.गिरीश बापटांना मंत्री व्हायचंय...खरं तर पुण्याचे आमदार गिरीश बापट व माझं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी होतं. त्यांनी तालिकेवर काम केलेलं असल्यानं त्यांना बरीच माहितीही आहे. त्यांनी अध्यक्ष व्हावं असं मलाही वाटत होतं. मात्र, त्यांना मंत्री व्हायचं असल्यानं त्यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला. नाना, तुम्ही एकदा मंत्री झाला आहात, मला एकदा तरी होऊ द्या, असं गिरीश बापट म्हणाले. अध्यक्षपदाच्या खुर्चीवर मी कधीच बसलो नव्हतो. आता मला हा बहुमान मिळाला आहे. त्याचं सोनं करणार! १मराठवाड्यातील खराब रस्त्यांबद्दल हरिभाऊ बागडे यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, मराठवाडा सोडता उर्वरित महाराष्ट्रातील रस्ते चांगले आहेत.२खराब रस्ते लवकर दुरुस्त झाले पाहिजेत. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीविषयी नानांनी चिंता व्यक्त केली. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारीच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न भेडसावेल. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. पाणीटंचाईच्या संदर्भातील बारकावे आपण अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. ४१९६५ ते ६९ या काळात हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार म्हणून काम केले होते. नंतर ते त्यांच्या अन्य कामांमध्ये गुंतून गेले आणि पुढे सक्रिय राजकारणात आले. साखर पुरवणीसाठी शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे आणि पद्मश्री विखे यांच्या मुलाखती घेतल्या. यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्यासारख्यांच्या पत्रपरिषदा कव्हर केल्या. या विश्वात बागडे आज रमून गेले होते. ४जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी हरिभाऊंचा शाल व बुके देऊन सत्कार केला. सतीश वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रमोद माने यांनी आभार मानले. यावेळी शिरीष बोराळकर, प्रदीप पाटील, संतोष लोखंडे पाटील, राजू शिंदे, राजू बागडे आदी कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
अध्यक्ष कुठल्याही पक्षाचा बांधील नसतो :बागडे
By admin | Updated: November 19, 2014 01:01 IST