उस्मानाबाद : अपुरा पाऊस झाला तर जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करा. ज्या तालुक्यात पाणी पातळी कमी झाली आहे, अशा कळंब, परंडा, भूम आणि वाशी तालुक्यात भूजल सर्वेक्षणच्या मदतीने अभ्यास करून पाणी पातळी वाढविण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जयस्वाल यांनी पाणीटंचाई आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, विभागीय आयुक्त राम नवर, अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती. बैठकीत जयस्वाल यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून त्यांच्या क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा, पाऊसमान कमी झाल्यास करावयाच्या उपाययोजना आदींची माहिती घेतली. सध्या जिल्ह्यात किती टँकर सुरू आहेत, मंडळनिहाय टँकर्सच्या खेपांची पडताळणी केली जाते का, टँकर बंद करून कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहेत का, आदी बाबींची विचारणा केली.याबरोबरच जयस्वाल यांनी परंडा येथे भेट देऊन नगर परिषद पदाधिकाऱ्यांसमवेत परंडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी केली. कायमस्वरूपी जलस्त्रोतांसाठी व तेथून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)वीज जोडणी तोडू नकासध्याच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात यंदा चारा टंचाई जाणवणार आहे का? असा प्रश्न करीत चारा उपलब्धता किती आहे, याची माहिती त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडून घेतली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तात्काळ वाटप करण्याबाबतची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात शौचालय हवेआयुक्त जयस्वाल यांनी यावेळी महसूलविषयक कामांचा आढावा घेतला. याशिवाय रोजगार हमी योजनेला निर्मल भारत अभियानशी सलग्न करून प्रत्येक गावात शंभर टक्के शौचालये असतील यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सुवर्ण जयंती राजस्व अभियानात जिल्ह्याने चांगले काम केल्याबद्दल कौतुक करीत राजस्व अभियानातील विविध कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोंचविण्यासाठी पुढाकार घ्या, असे ते म्हणाले.
पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार करा
By admin | Updated: July 25, 2014 00:29 IST