औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन ‘पेट-३’साठी सज्ज झाले असून, रविवारी शहरातील १७ केंद्रांवर पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाईल. यासाठी ९ हजार २१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यासंदर्भात ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे व परीक्षा नियंत्रक कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठात ‘पेट’ सेलची स्थापना करण्यात आली आहे. एकूण १० विद्याशाखांतील ५५ विषयांसाठी रविवारी ‘पेट’ घेतली जाईल. प्रशासनाच्या वतीने परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून, दोन सत्रांत ही परीक्षा होईल. रविवार, दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजता पहिला अनिवार्य पेपर असेल, तर दुपारी २.३० ते ४.३० यादरम्यान संबंधित विषयाचा पेपर असेल. परीक्षा आटोपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी (ओएमआर) दिली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल १० दिवसांच्या आत घोषित करण्यासाठी परीक्षा विभाग सज्ज झाला असून ‘पेट’चे समन्वयक म्हणून डॉ. माधव सोनटक्के व डॉ. सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक, अधिकारी परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विद्यापीठाने या परीक्षेसाठी १७ सहकेंद्रप्रमुख व २३ निरीक्षकांची नेमणूक केली आहे.
‘पेट’ची तयारी पूर्ण
By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST