वसमत : येथील केबीसीच्या एजंटचे हृदयविकाराने निधन झाल्याने मयताच्या मुलाने आता केबीसीविरोधात गुन्हा नोंदवण्याची तयारी केली आहे. वडिलाच्या मृत्यूस केबीसीचे संचालक व कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप मयत बालाजी गुज्जेवार यांचा मुलगा शिवकैलासने केला आहे.वसमत येथील पावरलूम भागातील रहिवासी बालाजी गुज्जेवार यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले होते. केबीसी कंपनीत त्यांची स्वत:ची मोठी गुंतवणूक होती व शिवाय इतरांनाही त्यांनी कंपनीत पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला होता. कंपनीचे एजंट म्हणून काम करणाऱ्या गुज्जेवार यांना कंपनी बुडाल्याच्या व गुंतवणुकदारांच्या तगाद्याचा त्रास असह्य झाला व हृदयविकाराच्या धक्याने त्यांचे निधन झाले होते. हा मृत्यू केबीसीमुळेच झाला असून कंपनी चालकाविरोधात गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी मयताचा मुलगा शिवकैलास गुज्जेवारने केली आहे. वसमत पोलिसांत रितसर तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वसमत येथे केबीसीचे प्रचंड नेटवर्क आहे. वसमत तालुक्यात किमान २० ते २५ कोटी रुपये केबीसीत गुंतल्याची चर्चा आता होत आहे. केबीसीत पैसे गुंतवणाऱ्यात वीज वितरण कंपनीतील सेवा निवृत्त कर्मचारी, अन्य कर्मचारी, व्यापारी, किरकोळ व्यावसायिक, नोकरदार, महिला आदींची मोठी संख्या आहे. फसल्या गेल्याची भावना झाल्याने आता गुंतवणुकदार एजंटांना तगादा लावत आहेत. एजंटही आता स्वत:ला सेफ करण्यासाठी कंपनीच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी करत असून सल्ला घेण्यासाठी वकीलांचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
केबीसी विरोधात तक्रारीची तयारी
By admin | Updated: July 18, 2014 01:52 IST