औरंगाबाद : विधानसभेच्या तोंडावर राजकीय पक्षाचा आसरा शोधण्याच्या प्रयत्नात असलेले गंगापूर-खुलताबाद तालुक्याचे आ. प्रशांत बंब यांना शिवसेनेतील तीव्र स्पर्धेमुळे विरोध होतो आहे. आ. बंब शिवसेनेत जाणार अशी फक्त चर्चा तालुक्याच्या राजकारणात सुरू होताच, त्यांना शिवसेना प्रवेशाचे दरवाजे बंद झाले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीला अपक्ष म्हणून तोंड देण्याचे अवघड वाटत असल्यामुळे आ. बंब यांनी राजकीय पक्षाचा सुरक्षित आसरा शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पूर्वाश्रमीचे भाजपाचे असलेले आ. बंब यांना राजकीय आधार गोपीनाथ मुंडे यांचा होता. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधी गेलेले जनमत पाहून आ. बंब यांनी मुंडे यांच्याशी संधान साधण्याचा प्रयत्न चालविला होता; परंतु दुर्दैव आड आले. त्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या अवया उठल्या. ही चर्चा सुरू होताच शिवसेनेतील स्पर्धक खडबडून जागे झाले व त्यांच्या समर्थकांनी या संभाव्य प्रवेशाला विरोध करणे सुरू केले आहे. तालुक्यातील तत्कालीन राजकीय फाटाफुटीचा फायदा घेत परिस्थितीवर स्वार होऊन आ. बंब यांनी गेल्या वेळेस विजय प्राप्त केला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते राष्ट्रवादीत सामील होण्याच्या बातम्याही पसरल्या; परंतु त्यानंतर त्यांनी तालुक्यात स्वतंत्र आघाडी स्थापन करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविल्या. त्यांच्या या खेळीने राष्ट्रवादीलाच फटका बसला व त्यांचे पक्ष नेत्यांशी बिनसले. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे त्यांचे पाठीराखे असल्याची चर्चा होती; परंतु टोलनाक्याच्या आंदोलनात आ. बंब यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे हा समजही दूर झाला. असे असले तरी यावेळेस राष्ट्रवादीची तिकिटे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मर्जीनुसार दिली जातील. यंदा तिकीट वाटपावर आर.आर. यांचा काहीही प्रभाव नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारीही आ. बंब यांना मिळणे दुरापास्त आहे. कोणताही प्रस्ताव आलेला नाहीआ. प्रशांत बंब यांच्या शिवसेना प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव जिल्हास्तरावर आलेला नाही. सर्वसामान्य व्यक्ती ते नेता अशा कुणालाही शिवसेनेत प्रवेश दिला जातो; परंतु हा प्रवेश कोणत्याही पूर्व अटी व शर्तीने दिला जात नाही. शिवसेना अटी, शर्ती मान्य करीत नाही. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
प्रशांत बंब यांना आता शिवसेनेचे दरवाजे बंद
By admin | Updated: July 29, 2014 01:14 IST