परंडा : सध्या तालुक्यातील अनेक गावे भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. असे असतानाच उपलब्ध असलेल्या थोड्याबहुत पाण्यावर तळहातावरील फोडाप्रमाणे जगविलेल्या पालेभाज्यांना बाजारात स्वताई आहे. लग्नसराई असल्याने लाल मिरची मात्र, अधिक ‘तिखट’ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्याच्या ठिकाणचा बाजार असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात विक्रेते, व्यापारी येतात. भाजीपाल्यासह धान्य,फळे, कपडे आदी वस्तू रास्त दरामध्ये मिळत असल्याने ग्राहकांची संख्याही मोठी असते. असे असले तरी रविवारी आठवडी बाजारात ग्राहकांची वर्दळ फारशी दिसून आली नाही. तसेच मागील एक -दोन महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे गावरान आंबा बाजारपेठेतून हद्दपार झाल्याचे पहावयास मिळते. पाण्याचे प्रमाण जास्त असणारे फळ म्हणून कलिंगडला विशेषत: उन्हाळ्यामध्ये मोठी मागणी असते. परंतु, यालाही अपेक्षित दर मिळत नसल्याचे दिसते. ६० रूपये विक्रीचे कलिंगड ३० रूपयांना विक्री करण्याची शेतकऱ्यांवर येवून ठेपली आहे. दरम्यान, फळांसोबतच वांगे, कांदे, बटाटे यांचेही दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. मेथीची भाजी वगळता अन्य पालेभाज्यांना स्वस्ताई असल्याचे दिसून येते. कोबी, प्लॉवर, शिमला मिरची, गवार, टोमॅटो यांचे दरही पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहेत. पालेभाज्यांच्या दरामध्ये झालेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात आले. एकूणच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे चित्र पहावयास मिळते. (वार्ताहर)
दुष्काळातही पालेभाज्यांना स्वस्ताई...
By admin | Updated: May 11, 2015 00:31 IST