नांदेड : राज्यातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयाबरोबरच आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एकसमान विद्यावेतन देण्याचा निर्णय झालेला आहे़ असे असतानाही आयुर्वेदच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक देण्यात येत असून विद्यावेतनात तब्बल पाच हजार रुपयांची तफावत ठेवण्यात आली आहे़राज्यातील मुंबई, नागपूर, नांदेड व उस्मानाबाद या चारही आयुर्वेद महाविद्यालयांत आजघडीला शेकडो पदव्युत्तर विद्यार्थी आहेत़ एकट्या नांदेडची संख्या जवळपास ४६ एवढी आहे़ २१ सप्टेंबर २००९ रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार, वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समान विद्यावेतन वाढ लागू करण्यात आली होती़ आजघडीला वैद्यकीय व दंत महाविद्यालयापेक्षा आयुर्वेदच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये कमी म्हणजेच ३५ हजार रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येते़ आयुर्वेद संचालकांनी विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे़ परंतु त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही़ याबाबत आयुर्वेदच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी पालकमंत्री डी़पी़सावंत यांची भेट घेवून त्यांना निवेदन देवून विद्यावेतनातील तफावत दूर करण्याची मागणी केली़ यावेळी भार्गव टप्पे, हर्षल खूनकर, अमित गजरमल, कुशल केळशीकर, श्रीपती नलमले, प्रीती थोरवे, रोशन सोनार, फरहीन शेख, स्रेहा आस्वले, महेंद्र गायकवाड, दत्तू कारंडे, प्रशांत मदनकर, कुशल चौधरी, अमोल दीपके, प्रवीण लेंडाळ, संदीप चौहान, स्वप्निल सक्सेना, गीता वर्मा, प्रियंका हंबर्डे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
आयुर्वेदच्या पदव्युत्तरांना मिळतेय सापत्न वागणूक
By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST