उस्मानाबाद : लोकवाट्यातून ज्या गावामध्ये जलसंधारणाची कामे सुरू करण्यात आली आहेत़ अशा २१ गावांसाठी मुंबई येथील श्री सिध्द गणपती मंदीर न्यास प्रभादेवी यांच्याकडून तब्बल एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली़सततची दुष्काळी स्थिती, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू करण्यासाठी माजी राज्यमंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी वेळोवेळी उस्मानाबाद, कळंब तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन जलयुक्त शिवार अभियान, जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व पटवून दिले आहे़ लोकसहभाग झाल्याशिवाय कामांना यश येत नसल्याचे सांगत जी गावे एक लाख रूपयापर्यंत लोकवाटा जमा करतील, अशा गावांना आमदार निधीसह इतर विविध शासकीय योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते़ ज्या गावांनी लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत, अशा गावांना प्रत्येकी अडीच लाखांचा निधी आ़ पाटील यांनी उपलब्ध करून दिला आहे़ शिवाय जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांना नाला खोलीकरण व रूंदीकरणासाठी मुंबई येथील श्री सिद्धीविनायक गणपती मंदीर न्यास, प्रभादेवी यांच्याकडून १ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे़ या न्यासकडून कळंब तालुक्यातील सापनाई, मंगरूळ, ताडगाव, बांगरवाडी, दुधाळवाडी, उपळाई, आंदोरा, कन्हेरवाडी, मोहा या गावांना तर उस्मानाबाद तालुक्यातील पळसप, वडगाव (सि़), पाडोळी (आ़), लासोना, पिंपरी, धारूर, उतमी (का़), पोहनेर, जुनोनी, वरवंटी, सकनेवाडी, किणी या गावांसाठी निधी देण्यात येणार आहे़ या गावांना प्रत्येकी जवळपास ४ ते ५ लाखाचा निधी देण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
प्रभादेवी ट्रस्टतर्फे कोटीचा निधी
By admin | Updated: May 27, 2015 00:39 IST