उस्मानाबाद : आजवरच्या निवडणुका पाहिल्या असता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना एकत्र करून उमेदवारी अर्ज दाखल करीत असत. या माध्यमातून उमेदवारांकडून एकप्रकारचे शक्तीप्रदर्शन केले जात असे. आणि त्यानंतर गावोगावी किमान चार-आठ दिवस शक्तीप्रदर्शनाच्याच गप्पा रंगत असत. परंतु, यावेळी याच्या उलट चित्र पहावयास मिळत आहे. विविध पक्षाच्या मातब्बरांसोबतच अपक्षांनीही शक्तीप्रदर्शनाला फाटा दिल्याचे दिसले.माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, माजी आमादार ज्ञानेश्ववर पाटील यांनी साधेपणे अर्ज दाखल केले. तर आमदार राहुल मोटे यांनी पदयात्रा काढून उमेदवारी दाखल केली. एकूणच मातब्बरांसोबतच अपक्षांनीही साधेपणाची कास धरल्याचे दिसत आहे.मागील काही दशकांतील निवडणुकीचे चित्र डोळ्यासमोर आणले असता, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या-त्या उमेदवारांकडून चार-पाच दिवस अगोदरच तयारी केली जात असे. पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गावोगावी कार्यकर्त्यांपर्यंत संदेश पाहोंचविला जात असे. त्यानंतर उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी सकाळीच गावोगावी वाहने पाठविली जात असत. या वाहनांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेवून उमेदवारांकडून शक्तीपद्रर्शन केले जात असे. जो-तो शक्तीपद्रर्शन करून एकप्रकारे आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीमध्ये याच्या उलट चित्र पहावयास मिळत आहे.नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच गुरूवारी उस्मानाबाद-कळंब या मतदार संघांतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह मोजकचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर उमरगा-लोहारा या मतदार संघातूनही विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनीही कसल्याही स्वरूपाचे शक्तीप्रदर्शन न करता मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत जावून उमेदवारी अर्ज दाखल केला. हेच चित्र परंडा विधानसभा मतदार संघामध्ये पहावयास मिळाले. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनीही कसल्याही पद्धतीचा गवगवा वा शक्तीप्रदर्शन न करता, आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर परंडा मतदार संघाचे विद्यमान आमदार राहुल मोटे यांनी भूम शहरातील गोलाई चौकापासून ते साहिल दूध केंद्रापर्यंत पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी पदयात्रेमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी जाहीर सभा घेवून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. रासपकडून बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनीही साधेपणाने मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)
शक्तीप्रदर्शनाला फाटा !
By admin | Updated: September 26, 2014 01:45 IST