वाशी : दरोडा प्रतिबंधक पथकाने पारगाव (ता़वाशी) परिसरात कारवाई करून चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत़ या दुचाकी वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून, चोरी प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे़ दरम्यान, चोरीच्या दुचाकी खरेदी करणाऱ्यांवर मात्र, कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ दरम्यान, याप्रकरणी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. वाशी येथील धनंजय सयाजीराव देशमुख यांची दुचाकी ३ जानेवारी २०१३ रोजी घरासमोरून चोरीस गेली होती़ तसेच २७ आॅगस्ट रोजी निवात विलास जगताप यांची दुचाकीही चोरीस गेली होती़ याशिवाय तालुक्यातील अनेक गावातील दुचाकींची चोरी झाली आहे़ दुचाकी चोरीच्या तक्रारी ठाण्यात दाखल होवूनही पोलिसांना तपासात यश आले नव्हते़ दुचाकी चोरांच्या मुस्क्या अवळण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गत काही महिन्यांपासून तपास यंत्रणा जोरात फिरवू लागले आहे़ यापूर्वी उस्मानाबाद तालुका व परिसरातून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या़ दरोडा प्रतिबंधक पथकाला पारगाव येथील उल्या उर्फ अरूण माणिक पवार व त्याचा साथीदार चिवल्या उर्फ शिवाजी बप्पा काळे (रा़लोणखस) यांनी दुचाकीची चोरी केल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीनंतर पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, स्थागुशाचे पोनि माधव गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोउपनि भास्कर पुल्ली यांच्यासह पोहेकॉ मधुकर घायाळ, तानाजी माळी, मोईज काझी, पोना वाहेद मुल्ला, प्रफुल्ल ढगे, नाना भोसले, सुनिल कोळेकर, सचिन कळसाईन, नज्जू पठाण, चालक काका शेंडगे यांनी शुक्रवारी कारवाई करून उल्या उर्फ अरूण माणिक पवार (रा़पारगाव) व रविवारी केलेल्या कारवाईत चिवल्या उर्फ शिवाजी बप्पा काळे (रा़लोणखस) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी चोरीची कबुली देत दुचाकी विकल्याची माहिती दिली़ शिवाय ज्यांना दुचाकी विकल्या आहेत, त्यांचीही माहिती त्याने दिली़ पोलिसांनी संबंधितांकडून चोरीच्या सात दुचाकी ताब्यात घेतल्या़ या दुचाकी वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत़ तपास पोनि शहाजी शिंदे, पोहेकॉ बोबडे हे करीत आहेत़ दरम्यान, दुचाकी चोरी गेलेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)वाशी पोलिसांना जाग; विविध मार्गावर तपासणीस्थानिक गुन्हे शाखेने सात दुचाकी ठाण्याच्या हद्दीतूनच पकडून दिल्याने वाशी पोलिस ठाणेही खडबडून जागे झाले आहे़ शहरातील विविध मार्गावर दुचाकी, चारचाकी थांबवून कागदपत्रांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ तर कागदपत्रे नसलेल्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते़चोरीच्या दुचाकी घेणाऱ्यांकडून पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत़ यातील काही दुचाकी घेणारे हे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जवळचे कार्यकर्ते असल्याचे समजत असून, त्यांना पोलिसांनी अभय दिल्याचे दिसत आहे़ पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे त्यांचेही धाबे दणाणले असून, चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून पोलिस ठाण्यात चकरा सुरू केल्या आहेत़ पोलिस प्रशासन मात्र, चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़
चोरीच्या सात दुचाकी पोलिसांच्या ताब्यात
By admin | Updated: November 18, 2014 01:06 IST