रवी गात । लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : अंबड नगरपालिकेची बहुतांश मालमत्ता गावगुंडाच्या ताब्यात आहे. मात्र या गावगुंडावर कारवाई करण्याऐवजी भ्रष्ट पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची साखळी गावगुंडानाच साथ देत आहे. शहर परिसरातील नगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालकीच्या दुकानांवर, गाळयांवर, सामाजिक सभागृहांवर तसेच मोकळया सहान जागेवर शहरातील काही पांढरपेशा गावगुंडानी कब्जा मिळविला आहे. हतबल नगरपालिका प्रशासन या गावगुंडावर कारवाई करणे, भाडे वसुल करणे, करार संपलेल्या गाळयांचा पुर्नलिलाव करणे, मोकळ्या सहान जागेंवरील अतिक्रमण काढुन टाकणे, अतिक्रमित बांधकामांना जमीनदोस्त करणे, सदरील गावगुंडावर कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आदी कठोर पावले उचलण्याऐवजी त्यांच्याच ताटाखालचे मांजर बनल्याचे चित्र अंबडमध्ये दिसत आहे. शहरात अंबड नगरपालिकेच्या मालकीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळील जुना मोंढा परिसरातील हॉकर्स मार्केट येथे १६ दुकान गाळे, आठवडी बाजाराजवळ १८ दुकान गाळे, नगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळील शॉपिंग सेंटरमध्ये २५ दुकान गाळे, शादीखाना शेजारील जुनी भाजीमंडई येथे १५ दुकान गाळे, शंकरराव चव्हाण शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये २० दुकान गाळे, जुनी पालिका इमारतीजवळ ५ दुकान गाळे असे एकुण तब्बल १०४ दुकानांचे गाळे शहरात आहेत. नगरपालिकेच्या गाळयांचा पहिला लिलाव १९७७ मध्ये करण्यात आला होता. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. शहरात पालिकेच्या नेमक्या किती स्थावर मालमत्ता आहे व त्या मालमत्ता सध्या कोणाच्या ताब्यात आहे याविषयी माहिती उपलब्ध नसल्याचे आढळून आले. याविषयी मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पालिकेच्या मालमत्ता खाजगी व्यक्तींच्या ताब्यात
By admin | Updated: May 24, 2017 00:40 IST