कचनेर : पैठण तालुक्यातील वरवंडी लघुसिंचन तलावातील पाणीसाठा राखीव ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असताना त्यातून काही शेतकरी बेसुमार पाणी उपसा करीत आहेत.त्यामुळे या तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत असून, यंदाचा कमी पावसाळा पाहता भविष्यात या परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या तलावाच्या संपादित केलेल्या भागात काही शेतकऱ्यांनी विहिरी करून मोटारी बसविल्या असून, काहींनी पाईपलाईन टाकून पाणी उपसा सुरू केला आहे. विशेष म्हणजे रात्री -बेरात्री पाणी उपसा करून बागायती भागास पाणी दिले जाते. त्यामुळे तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी कमी होत असून, सिंचन विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यातच महावितरणने तलावाभोवतालचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिलेला असताना आणि तहसीलदार, तलाठी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असतानाही ही परिस्थिती कायम आहे. या तलावातून तीन गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. पाणीसाठा संपुष्टात आल्यास या गावांवर भविष्यात भटकण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी हा तलाव १०० टक्के भरला होता; पण काही शेतकऱ्यांनी सांडवा फोडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते.त्यानंतर सांडव्याची जुजबी दुरुस्तीही करण्यात आली होती. सिमेंट काँक्रीटने दुरुस्ती न करता मुरूम व दगडाने सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली होती. (वार्ताहर)
वरंडी धरणातून बेसुमार पाणी उपसा
By admin | Updated: July 21, 2014 00:35 IST