गोरेगाव : येथील जि. प. शाळेतील निलेश कावरखे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. मात्र घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत जमवलेल्या लोकवर्गणीतून त्याला पुढील शैक्षणिक खर्चासाठी ३५ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली.आई-वडिल भूमीहिन शेतमजूर आणि घरची परिस्थिती अतिशय बिकट असतानासुद्धा गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील निलेश कावरखे या विद्यार्थ्यांने जिद्द व अभ्यासातील सातत्य कायम राखत इयत्ता दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त केले. त्याने सेनगाव तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. निलेशच्या अंगी असलेली अभ्यासासाठीची जिद्द व जिज्ञासू वृत्ती ग्रामस्थांनी लक्षात घेत सदर होतकरू गरीब विद्यार्थ्यास पुढील शिक्षण दर्जेदार मिळण्याच्या उद्देशाने गावामध्ये लोकवर्गणीचा उपक्रम राबविला. यामध्ये गावातील व्यापारी, औषधी व्यावसायिक, डॉक्टर असोसिएशन तसेच शालेय शिक्षण विभाग व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामधून निलेशला पुढील शैक्षणिक खर्चासाठी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी पं. स. चे उपसभापती डॉ. आर. जी. कावरखे, सरपंच सोपानराव पाटील, उपसरपंच डॉ. रवी पाटील, जगन पाटील, गजानन धुळधुळे, रामराव खिल्लारी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
लोकवर्गणीतून गरीब विद्यार्थ्यास मदत
By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST