लातूर : सावित्रीनदीच्या पुरात मुंबई-गोवा महामार्गावरील जुना पूल ढासळून वाहून गेला़ त्यात ३५ जणांचा मृत्यू झाला़ ही घटना कालची आहे़ पण लातूर जिल्ह्यात पुलावरून वाहन कोसळून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत़ दोन महिन्यांपूर्वी महापूरच्या पुलाचा कठडा नादुरूस्त असल्याने जीप नदीपात्रात कोसळून चौघा जणांचा मृत्यू झाला़ याच पुलाचा कठडा नादुरूस्त असल्यामुळे एक ट्रॅव्हल्स पडून १२ जणांचा बळी गेला होता़ तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने बोध घेतला नाही़ लातूर जिल्ह्यात असे अनेक पूल नादुरूस्त अवस्थेत आहेत़ त्याचा स्पॉट पंचनामा ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी गुरूवारी केला़ हे पूल नव्हेत ‘मौत का कुआँ’ आहेत, अशी स्थिती आहे़ कुठे कठडे तर कुठे पुलाच्या भिंती कोसळल्या आहेत़ जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ लातूर जिल्ह्यातील प्रवाशांवर आहे़ तरीही बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे़ लातूर जिल्ह्याला जोडणारे एकूण १६ रस्ते आहेत़ लातूर-औसा, लातूर-बार्शी, लातूर-उदगीर, लातूर-अंबाजोगाई, लातूर-नांदेड, लातूर-कळंब तसेच अंतर्गत सारसा-वांजरखेडा, नायगाव-माटेफळ लातूर- कव्हा-जमालपूर, महापूर- बोरी, लातूर-पानगाव, रेणापूर-उदगीर - देगलूर आदी रस्त्यांवर छोटे- मोठे २६१ पूल आहेत़ मांजरा नदीवर लातूर-अंबाजोगाई आणि लातूर - नांदेड मार्गावर महापूर व भातखेडा गावानजिक मोठे पूल आहेत़ या रस्त्यांवर वर्दळ असते़ विशेष करून महापूरचा पूल अपघात प्रणव म्हणूनच ओळखला जातो़ वारंवार या पुलाची दुरूस्ती होणे गरजेचे आहे़ मात्र त्याकडे दुर्लक्ष होते़ अपघात झाल्यानंतरच डागडुजी केली जाते़ त्यानंतर दुर्लक्ष़ परिणामी, या पुलाच्या नादुरूस्तीमुळे अनेक अपघात घडून माणसे दगावली आहेत़ तरीही बांधकाम विभागाकडे पुलांच्या स्थितीबाबत अपडेट माहिती नाही़ कोणता पूल नादुरूस्त झाला आहे़ त्याचा कालावधी काय, याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवली नाही़ ‘लोकमत’च्या वार्ताहरांनी १५ पुलांवर गुरूवारी ठाण मांडले़ उदगीर, देवणी, जळकोट, निलंगा, अहमदपूर, रेणापूर, लातूर, चाकूर, शिरूरअनंतपाळ, औसा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या बहुतांश पुलांची अवस्था दयनीय आहे़ अहमदपूर-उदगीर या राज्यमार्गावरील हाळीजवळील निजामकालीन तिरू नदीवरील पूल जीर्ण झाला आहे़ पुलाच्या भिंतीतून मोठ-मोठी झाडे उगविली आहेत़ तर मांजरा नदीवरील गिरकनाळ पुलाला तडे गेले आहेत़ यंत्रणेचे दुर्लक्ष आहे़ (सविस्तर वृत्त हॅलो ४ वर)
जिल्ह्यातील पूल बनलेत ‘मौत का कुआँ’; कठडे गायब, भिंती खचल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 00:14 IST