कारला : जालना तालुक्यातील ईस्लामवाडी, पुणेगाव, तांदुळवाडी, वडगाव आदी परिसरात २ व ३ जून रोजी वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळामुळे डाळींब बागांचे मोठे नुकसान झाले. कधी गारपीट तर कधी अवकाळी पावसाने, वर्षभर बळीराजावर अस्मानी संकट कोसळत आहे. त्यांचा सामना करताना शेतकर्यांची मोठी दमछाक होत आहे. २ व ३ जून रोजी जालना तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी चक्रीवादळ आल्याने बागायतदार शेतकर्यांचे त्यात मोठे नुकसान झाले. इस्लामवाडी, पुणेगाव तांदुळवाडी, बोरखेडी, अहंकार देऊळगाव, कडवंची, भाटेपूरी, हिस्वन, कारला, ममदाबाद आदी गावाना त्याचा फटका बसला. डाळींब झाडांची पाने गळून पडली. काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या, झाडे उन्मळून पडून मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावे, शेतकर्यांना नुुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान दुसर्या दिवशी मंगळवारीही जालना तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. रांजणीला पावसाने झोडपले रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणीत मंगळवारी सायंकाळी ५ वाजता झालेल्या वादळी वार्यासह पावसाने काही ठिकाणी पडझड झाली. अचानक आलेल्या या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली. ग्रामस्थांचीही तारांबळ उडाली. वादळामळे मालमत्तांची पडझड झाली. जि. प. शाळेचे पत्रे उडाले, ती शेख गफ्फार शेख जमाल यांच्या घरावर पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले. विवेकानंद इंग्रजी शाळेतील खिडक्यांच्या काचा फुटल्या, फर्निचरचे मोठे नुकसान झाले. जोरदार वार्याने विजेचे दोन खांब कोसळले आहे. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला. ठिकठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, खांब व झाडेही उन्मळून पडली. तारा पडल्याने विजेचा धक्का लागण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तसेच गाव व परिसरातील अनेक फळबागधारक शेतकर्यांच्या शेतातील बागांचे मोठे नुकसान झाले. फेब्रुवारी-मार्च महिन्यातही या भागाला गारपिटीने झोडपले होते. या गारपिटीतही शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (वार्ताहर)जालना तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे नंदापूर, बोरखेडी, थार, धारकल्याण अहंकार देऊळगाव कडवंची, रामनगर, सेवली आदी भागातील डाळींब, मोसंबी, द्राक्ष आदी बागांसह शेडनेट व घरांवरील पत्रे उडाल्याने पडझड होवून मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रूपये प्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर दीपक डोके, राजेंद्र खरात, संतोष मोरे, कृष्णा जाधव अंकुश खरात, रमेश काळे आदींच्या सह्या आहेत. मागील तीन महिन्यापासून फळबाग धारक शेतकर्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. गारपीट, अवकाळी पाऊस व आता चक्री वादळाने मोठे नुकसान झाले.गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीतून कसेबसे सावरून डाळींबाची काही झाडे जगविली. दोन महिन्यानंतर झाडावरील डाळींब विक्रीसाठी येणार होते. जिवापाड प्रेम करून व पैसा खर्च करून झाडे जगविली मात्र ती चक्रीवादळाने उद्ध्वस्त झाल्याने तोडचा घास हिरावून गेला असल्याचे डाळींब उत्पादक अरुणराव भिसे यांनी सांगितले.
डाळींब बागा झाल्या आडव्या
By admin | Updated: June 5, 2014 00:50 IST