औरंगाबाद : कोरोना आजाराचा संसर्ग हळूहळू कमी झालेला असताना रविवारी शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात १ लाख ६० हजार ८४३ बालकांना डोस देण्यात आले. रविवारी मोहिमेत सहभागी न झालेल्या बालकांना आज, सोमवारपासून प्रत्येक घरी जाऊन डोस देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरात ६७८ बुथवर ० ते ५ वयोगटातील बालकांना लस देण्यात आली. १ महिन्यापर्यंतच्या ८०४ बालकांना डोस देण्यात आले. १ लाख ९८ हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. रविवारी ८१ टक्के बालकांना लस देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मोहीम यशस्वी करण्यासाठी ४० वैद्यकीय अधिकारी, १८९० कर्मचारी, १३६ सुपरवायझरची नियुक्ती करण्यात आली होती. रेल्वे स्थानक, बसस्थानक विमानतळ, मॉल्स, आदी ठिकाणी १५ ट्रान्झिट टीम, २७ मोबाईल टीमची नेमणूक केली होती. शहरात कचरा जमा करणाऱ्या ३०० रिक्षा आहेत. या रिक्षांवर भोंगा लावून जनजागृती करण्यात आली. तत्पूर्वी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ सकाळी ८ वाजता सिडको एन-८ रुग्णालय येथून बाळांना डोस पाजून करण्यात आला. यावेळी उपसंचालक आरोग्य विभाग, पुणे तथा पोलिओ नोडल अधिकारी डॉ. जी. एम. गायकवाड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भामरे, डॉ. प्रेरणा संकलेचा, डॉ. सीमा बुशरा, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद आणि जिल्हा परिषद साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. बारडकर यांनी बाळांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचा प्रारंभ केला.