जालना : माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय कामकाज गतीमान व पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी सर्वच विभाग इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा प्रशासनातील काही विभाग आॅनलाईन प्रणालीत जोडले गेलेले आहेत. त्या पाठोपाठ आता जिल्हा पोलिस दलही आॅनलाईन झाला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्याची स्टेशन डायरी हद्दपार झाली आहे.जालना जिल्ह्यात १६ पोलिस ठाणे आहेत. या पोलिस ठाण्यात दाखल होणारे गुन्ह्याची नोंद डायरीत न घेता ती आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे.त्यानुसार जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारी या जिल्हा नियंत्रण कक्ष, पोलिस अधीक्षकांपासून ते पोलिस महासंचालकापर्यंत दिसणार आहे. राज्यातील कोणत्या पोलिस ठाण्यात कोणता गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याची प्रगती आदीसर्वच बाबी त्यात नोंदविल्या जाणाऱ्या आहेत. तसेच तक्रारदारांनाही एफआयआरची प्रत ही आॅनलाईन केलेल्या तक्रारीची प्रिंटच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. शासनाच्या ई गव्हर्ननस प्रकल्पामुळे पोलिस दलही आॅनलाईन झाला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यातील स्टेशन डायरी व एफआयआर रजिस्टर हे हद्दपार झाले आहे. जालना जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसांपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र काही ठाण्यात तांत्रिक अडचनी येत असल्याने तेथे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पोलिसांची स्टेशन डायरी हद्दपार
By admin | Updated: January 3, 2016 23:55 IST