लातूर : येथील एमआयडीसीतील एका वसतीगृहातून पसार झालेल्या ४ तरुणींच्या शोधासाठी एमआयडीसी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले असून, पथकातील कर्मचारी तरुणाींच्या राहत्या घराच्या पत्त्यावर त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. एमआयडीसीतील ए-४५ जागेत मागास जनसेवा समितीद्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘उज्ज्वला प्रकल्प’ या वसतिगृहामधून रविवारी पहाटे २२ ते ३० वयोगटातील चार तरुणी गायब झाल्यानंतर सोमवारी पोलिस ठाण्यात चारही तरुणी हरवल्याची तक्रार दाखल झाली़ महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या पथकाने सोमवारी स्थळ पंचनामा करुन, वसतिगृह अधीक्षकाला व संस्थाप्रमुखास कारणे दाखवा नोटीस बजावून ७ दिवसाच्या आत खुलासा मागविला आहे़ तर एमआयडीसी पोलिसांनी या चारही तरुणींच्या शोधासाठी सहाय्यक फौजदार घोडके यांच्या पथकामार्फत शोध घेण्याचे काम सुरु केले आहे़ या चौघी नाशिक, पुणे-नगर रोडवरील सिकंदरपूर, लातूर व कलकत्ता येथील रहिवाशी असून, त्यांच्या घरातील नातेवाईकांकडे चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले़ दोघीजणी बीड येथील न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाल्या होत्या़ तर दोघींजणी लातूरच्या न्यायालयाच्या आदेशानुसार आल्या होत्या, त्यादृष्टीनेही तपासणी सुरु आहे़ या वसतीगृहातील स्वच्छतागृह व स्रानगृहाची खिडकी उचकटून बाहेरील पत्र्यांवर उतरुन त्या चौघी पसार झाल्यामुळे तेथील स्थळ पाहणी करण्यात आली आहे़ या तरुणीकडे भ्रमणध्वनी नाही़ तसेच पैसेही नसल्यामुळे त्या चौघीजणी लातूर शहर परिसरातच असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)काटगाव प्रकरण झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय व खाजगी महिला वसतीगृहांची सुरक्षा व्यवस्था तपासावी, अशी मागणी आपण केली होती़ याबाबत जिल्हाधिकारी,समाजकल्याण अधिकारी, महिला बालविकास अधिकारी कार्यालयातील प्रमुखांना भेटून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी करण्याबाबत आपण आग्रही भूमिका मांडली आहे़ एमआयडीसीतील उज्ज्वला प्रकल्प या वसतिगृहातून चार तरुणी पसार होण्याच्या घटनेला वसतिगृहचालक जबाबदार आहेत़ त्यांनी योग्य सुरक्षा ठेवणे गरजेचे होते़ त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याबाबत आपण महिला बालविकास कार्यालयातील वरिष्ठांकडे मागणी केली आहे, असे महिला आयोगाच्या सदस्या आशाताई भिसे यांनी सांगितले़
चार तरुणींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक
By admin | Updated: April 29, 2015 00:53 IST