जालना : चांगल्याचे रक्षण आणि दुर्जनाचा बंदोबस्त करणे, हे पोलिसांचे ब्रीद आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक ठेवतानाच सामान्य नागरिकांना चांगली वागणूक दिली पाहिजे, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी घनसावंगी येथे केले.घनसावंगी येथे बांधण्यात येणाऱ्या पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व कृषी राज्यमंत्री संजय सावकारे हे उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीमंत हारकळ, तहसीलदार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख, रमेश पैठणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रताप जाधव आदी उपस्थित होते.घनसावंगी तालुक्याचा दर्जा मिळाला तेव्हा हे गाव छोटेसे होते. आता अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यात प्रशासकीय इमारत झाली असून ग्रामस्थांना एकाच छताखाली अनेक कार्यालय उपलब्ध झाली आहेत. आता पोलीस ठाण्याची इमारतही सुंदर होईल या इमारतीत सर्व प्रकारच्या सोयी असणार आहेत. त्यामुळे पोलिसांना काम करण्यास उत्साह येईल असे मत टोपे यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी राज्यमंत्री सावकारे म्हणाले की, आर.आर.पाटील गृहमंत्री झाल्यापासून पोलीसांना विविध सुविध उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न होत आहेत. येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामावर ६८ लाख खर्च होणार आहेत. त्यामुळे हे पोलीस ठाणे उत्तम दर्जाचे होईल याशिवाय एक कोटी १५ लाख रूपये खर्च करून बारा निवासस्थाने पोलिसांसाठी बांधण्यात येणार आहेत. पोलिसांबाबत गुन्हेगारात जरब बसली पाहिजे पण सामान्य माणसाला त्यांच्या कामाबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.यावेळी डॉ.प्रताप जाधव यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरिक्षक अशोक घारेवाड यांनी केले. (प्रतिनिधी)
पोलिसांनी नागरिकांना चांगली वागणूक द्यावी
By admin | Updated: August 4, 2014 00:51 IST