औरंगाबाद : मुथुट फायनान्सवरील दरोडा प्रकरणातील आरोपी शोधता शोधता औरंगाबाद गुन्हे शाखा पोलिसांना नाशिक येथील मणिपुरम फायनान्सवर पडलेल्या तीन कोटी रुपयांच्या दरोड्याचा ‘वाँटेड’ सूत्रधारच हाती लागला. एकनाथ पाष्टे (४०, रा. पाष्टेपाडा, शहापूर, ठाणे) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसाच्या वेशात सहा साथीदारांच्या मदतीने एकनाथने ही लूट केली होती. गेल्या दोन वर्षांपासून तो नाशिक पोलिसांना चकमा देत होता. अटकेनंतर औरंगाबाद पोलिसांनी त्याला नाशिक पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. गेल्या महिन्यात औरंगाबादेतील गजबजलेल्या जालना रोडवरील अमरप्रीत चौकातील मुथुट फायनान्स या कंपनीवर पोलीस वेशात आलेल्या एका टोळीने भरदिवसा दरोडा टाकला होता. पिस्तूलचा धाक दाखवून या टोळीने लुटीचा प्रयत्न केला; परंतु या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने सतर्कता दाखविल्याने आरोपींचा प्रयत्न फसला. पिस्तूलचा धाक दाखवून ही टोळी नंतर तेथून फरार झाली होती. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या आरोपींच्या कारनाम्याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्हीत झालेले आहे; परंतु अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे स्वत: या तपासावर लक्ष ठेवून आहेत, हे विशेष.
पोलीस वेशात दरोडे टाकणारा गजाआड
By admin | Updated: June 17, 2016 00:39 IST