हदगाव : येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे थोडा पाऊस पडला की, अनेक घरांना गळती लागणार असल्याने कुटुंबाने राहावे कुठे असा प्रश्न जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस कुटुंबियासमोर उपस्थित झाला आहे. हदगाव ठाण्याची इमारत सुसज्ज झाली परंतु जीव मुठीत घेऊन जनतेसाठी काम करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबियांना मात्र पडक्या इमारतीत रहावे लागत आहे. यामुळे त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. सन १९८४-८५ मध्ये या वसाहतीचे बांधकाम झाले. त्यानंतर सोयीनुसार ४-५ वर्षाला निवासस्थानांची डागडुजी करण्यात आली. ही घरे १० बाय १० किचन व बाथरुम अशा स्वरूपाची आहेत. पती-पत्नी व २ मुलं असा छोटा परिवार यामध्ये राहू शकतो. परंतु पाहुणा आल्यास त्याची मात्र मोठी गैरसोय होते. अशी परिस्थिती असताना देखील ही मंडळी खुश परंतु घर कोरडं असाव एवढी अपेक्षा. कर्मचारी असूनही जागा अपुरी असल्यामुळे अनेकांनी स्वखर्चाने मजुरांच्या घरासारखे समोर टिन लाऊन संसार धकवला. या ठिकाणी असलेले दोन हातपंप व बोअरवेलही बंद अवस्थेत आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे सार्वजनिक नळाचे पाणी भरावे लागते. पाण्यासाठी कुटूंबियांनी वणवण फिरावे लागते. जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे कुटूंब असुरक्षित आहेत. यामुळे या परिसरात मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या वेतनातून घरासाठी १२०० ते १५०० रुपये मसिक भाडे कपात केले जाते. परंतु त्या तुलनेत कोणत्याही सुविधा नाहीत. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना महिलांना असुरक्षितता वाटते. यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामावरही ताण पडतो. रात्री कर्तव्य बजावताना वारंवार घरी फोन करुन काळजी घ्यावी लागते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पोलिसांसाठी नवीन पोलिस वसाहती बांधून देण्याची मागणी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियातून होत आहे. (वार्ताहर)६४ पैकी १४ च घरे वापरात एकूण ४६ घराची संख्या आहे. त्यापैकी १४ घरे वापरात असून उर्वरित पडकी झाली आहेत. व्यवस्थापन नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. चारही बाजुकडून अतिक्रमणे झाली आहेत. संरक्षण भिंत नाही. रस्त्याची स्थिती दयनीय असून साहित्य अर्धवट अवस्थेत पडले आहे. सहा वर्षापासून वाचनालय व मनोरंजन केंद्र कॉलनीतले बंद आहे. त्याच्यावरील पत्रे उडून गेली आहेत.
पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था
By admin | Updated: June 22, 2014 00:41 IST