संजय तिपाले , बीडसाहेब, मॅडम लक्ष ठेवा... आमूक- आमूक चिन्ह आहे... मी तमूक- तमूक पॅनलकडून उभा आहे... ३१ आॅगस्टला मतदान आहे... हे संवाद आहेत जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांतील. चौकात बॅनर्स, पोस्टर्सने रंगलेल्या ठाण्यांच्या इमारती, धूळ उडवत फिरणाऱ्या गाड्या अन् दोन्ही हात जोडून मतांसाठी घातले जाणारे साकडे अशा उत्साही वातावरणात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. निमित्त आहे पोलीस पतसंस्था निवडणुकीचे! प्रत्येक निवडणुकांत बंदोबस्त करुन थकणाऱ्या पोलिसांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.१९९० च्या दशकात मुहूतमेढ रोवल्या गेलेल्या या पतसंस्थेची सभासद संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. वार्षिक उलाढालीने कोट्यवधींची उड्डाणे घेतली आहेत. चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकपदाचा ‘अर्थ’ साऱ्यांनाच उमगला आहे. त्यामुळे आतापर्यंत बिनविरोध निघणाऱ्या पतसंस्थोत स्थापनेनंतर पहिल्यांदाच जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आखाड्यात चार पॅनल आमने- सामने आहेत. तीन अपक्षांनीही दंड थोपटून निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. घराचे बांधकाम, मुला- मुलींचे शिक्षण, लग्न यासाठी तातडीचे २० हजार रुपये व जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतची दीर्घ कर्ज प्रकरणे या पतसंस्थेतून मंजूर केली जातात. पूर्वी पोलीस अधीक्षक हे पदसिद्ध अध्यक्ष व उपअधीक्षक (गृह) हे व्हाईस चेअरमन असत.कर्जप्रकरणे मंजूर करुन करण्यावरुन सभासद व संचालकांत उठलेल्या वादंगाला वैतागून तत्कालीन अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर चेअरमनदाची धुरा संचालक भाऊसाहेब गुंड यांच्या खांद्यावर आली होती.पंचवार्षिक निवडणुकीत राजाभाऊ गुळभिले यांनी पोलीस कल्याण पॅनल उभे केले आहे. त्यांनी माजी संचालकांची मोट बांधून त्यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान चेअरमन भाऊसाहेब गुंड यांचे प्रगती पॅनल असून त्यांनीही अनुभवी मंडळींना सोबत घेतले आहे. जुन्या- नव्या भिडूंना घेऊन भागवत शेलार यांनी पोलीस आधार पॅनलची मुहूर्तमेढ रोवली आहे. तिकडे अशोक नलावडे, सुरेश गित्ते, सुभाष महाडिक यांच्या मार्गदर्शकाखाली तरुणतुर्कांनी हाबूक ठोकला आहे. संदीप गिराम, बाबासाहेब जगदाळे, अभिमन्यू औताडे ही अपक्ष त्रिमूर्ती अनुक्रमे तलवार, मशाल व ढालतलवार या चिन्हांसह रिंगणात उतरली आहे.संचालकपदाच्या ११ जागांसाठी ५४ जणांचे अर्ज आले होते. त्यापैकी एक अर्ज बाद झाला तर चौघांनी दोन डमी अर्जांसह माघार घेतली. ११ जागांसाठी आता ४७ जणांना सामना रंगला आहे. १३२५ सभासद ३१ आॅगस्ट रोजी मतदानाचा हक्क बजावतील. बीडमध्ये पोलीस मुख्यालयावर व गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, आष्टी येथे उपनिबंधक कार्यालयांत मतदान होणार आहे.अस्तित्व, प्रतिष्ठेच्या या लढाईत प्रगतीच्या कपबशीची ‘प्रगती’ होते, कल्याण पॅनलचे विमान भरारी घेते, परिवर्तनचा पतंग विजयाला साद घालतो की आधार पॅनलची छत्री कमाल करते हे पाहणे रोमांचक ठरणार आहे. अपक्षांचाही कस लागणार असून तूर्त मतांचा ‘ताळेबंद’ मांडण्यातच सारे व्यस्त आहेत.
पोलीस पतसंस्थेचा ‘हायटेक’ प्रचार !
By admin | Updated: August 29, 2016 01:02 IST