लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील ‘काँक्रीट टेक्नॉलॉजी’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेची मोबाइल स्नॅपचा वापर करून हायटेक कॉपी पुरविणा-या रॅकेटचा पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. त्या प्रकरणातील एका तरुणीसह तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर मोबाइल प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे.बीड रस्त्यावरील भालगाव येथील शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी परीक्षा देणारा रवींद्र उत्तम पवार (रा. तोलानाईक तांडा, ता.औरंगाबाद) आणि हायटेक कॉप्या पुरविणारा अक्षय त्र्यंबक सरकटे (२२, रा. देवखेड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) यांना पोलिसांनी अटक केली असून, दिव्या सतीश गाजरे (२०, रा. गुलमोहर कॉलनी, एन-५) या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.मंगळवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. फरार आरोपी आशिष जोगदंड याचा शोध सुरू आहे. ९ नोव्हेंबरपासून या कॉलेजमध्ये परीक्षा सुरू आहेत. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कॉलेज परिसरात कॉपी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.परीक्षा केंद्राबाहेर एका कारमध्ये काहीजण पुस्तकाच्या चिठ्ठ्या फाडताना व त्या मोबाइलद्वारे परीक्षा कक्षातील विद्यार्थ्यांना पाठवीत असल्याचे चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या पथकाला निदर्शनात आले. कारमध्ये बसलेल्या अक्षय सरकटे आणि दिव्या गाजरे यांना ताब्यात घेतले, तर जोगदंड पसार झाला. पकडलेल्या दोघांकडे पुस्तकातून काढलेल्या चिठ्ठ्या आढळल्या. यावेळी पोलिसांनी अक्षय सरकटे याच्या हातातील मोबाइल घेऊन पाहणी केली. त्याच्या मोबाइलमध्ये कॉलेजमध्ये चालू असलेल्या ‘काँक्रीट टेक्नॉलॉजी’ या पेपरचे काही फोटो (स्नॅप) काढलेले दिसले. परीक्षा केंद्रात बसलेल्या रवींद्रने त्याच्या पेपरचे काही स्नॅप व्हॉटस् अॅपद्वारे अक्षयकडे पाठविले होते. या स्नॅपनुसार प्रश्नांची उत्तरे कारमध्ये बसलेले तिघे पाठवत असल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेहोते.
तरुणीसह तिघांना पोलीस कोठडी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:55 IST