गजेंद्र देशमुख , जालना शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस ठाणे आहेत. पोलिस ठाण्याशिवाय काही भागात पोलिस चौक्यांची उभारणी पोलिस दलाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र या चौक्या नावालाच असल्याचे चित्र गुरुवारी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशमधून उघड झाले. बहुतांशी पोलिस चौक्यांना कोणीच वाली नव्हते. शहरातील वाढत्या चोऱ्या, मुले पळवून नेण्याच्या अफवा या पार्श्वभूमीवर शहरातील पोलिस चौक्यांचे स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. पोलिस ठाण्यांशिवाय शहरातील विविध भागात दहा पोलिस चौक्या आहेत. लोकमतने सकाळी ११ वाजता या चौक्यांचे स्टिंग आॅपरेशन सुरु केले. भोकरदन नाका चौकीत पोलिस कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरु होते.दुपारनंतरही ही चौकी बंद झाली. यानंतर मूर्गी तलाव येथील पोलिस चौकी उघडी असली तरी आतील परिस्थितीवरुन ती बंदच असल्याचे चित्र दिसून आले. येथील पोलिस चौकीत कोणीच येत नसल्याचे परिसरातील काहींनी सांगितले. जवाहर भाग, लालबाग आणि कन्हैयानगर हा भाग काही प्रमाणात संवेदनशील म्हणून ओळखला जातो. असे असले तरी येथील पोलिस चौकीत एकही कर्मचारी नव्हता. या चौकीचे नव्याने बांधकाम करण्यात आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील पौलिस चौकीही बंदच होती. बांधकाम विभागात वारंवार होणारे वाद लक्षात घेता येथे पोलिस चौकी सुरु करण्यात आली. ही चौकीही अनेक दिवसांपासून बंद असल्याचे सांगण्यात आले. कादराबाद येथेही नव्याने बांधण्यात आलेली चौकीही शोभेसाठी असल्याचे दिसून आले. सुसज्ज बांधकाम झालेले असले तरी ही चौकीही कुलूपबंदच होती. चौकी कधी उघडते याची माहिती कोणीही देऊ शकले नाही. मस्तगड भागातील पोलिस चौकी, बसस्थानक, बाजार चौकी, सरस्वती भुवन शाळा परिसरातील चौक्या बंदच आढळून आल्या. शहरात मंगळसूत्र चोरी, विद्यार्थिंनींना छेडछाडीचे प्रकार तसेच मुलांना पळवून नेण्याच्या अफवेने भयभीत झाले आहे. त्या त्या भागातील पोलिस चौकीत पोलिस असल्यास एक जरब असते. मात्र या चौक्यांना संरक्षण देण्याची वेळ आली आहे. शासनाने लाखो रुपये खर्च सुसज्ज अशा चौक्या बांधूनही काही उपयोग होतो की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. शहरात सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही बसविले असले तरी ते कितपत उपयोगी पडतात किंवा किती दिवस टिकतात. शहरातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ व संवेदनशील भागात या पोलिस चौक्या आहेत. या चौक्या जर सुरु राहित्यास परिसरात एक प्रकारचा वचक राहत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. मात्र पूर्वी या चौक्या नियमित सुरु राहत. आता काही एक दोन चौक्याच नियमित उघडतात. पोलिस प्रशासनाने या चौक्या नियमित सुरु ठेवून तेथे पोलिस बळ वाढविण्याची अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली. ४मूर्गी तलाव, मस्तगड, बाजारचौकी, कदराबाद भागात नवीन पोलिस चौक्या बांधण्यात आल्या आहेत. येथे बसण्यासाठी सुसज्ज जागा तसेच फर्निचरही आढळून आले. मात्र पोलिस कोणी आढळून आले नाही. बाजारचौकीला हातगाड्यांचा विळखा पडलेला असतो. ४सरस्वती भुवन शाळेजवळ विद्यार्थिनींची छोडछाड रोखण्यासाठी पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र कधी उघडते कोणला मदत मिळते याची माहिती कोणाकडेच नाही. सध्या दहावी तसेच बारावी परीक्षा सुरु असल्याने हे मदत केंद्र सुरु करावे, अशी अपेक्षा काही विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. कालीकुर्ती भागात जुनी पोलिस चौकी होती. आता ती गायब झाली आहे. बडीसडक हा शहरातील मोठा विभाग येतो. अस असले तरी येथील पोलिस कर्मचारी गायब आहे. एका पोलिस चौकीत दोन पोलिस असतात. वेळप्रसंगी एखादा गुन्हा येथे दाखल केला जाऊ शकतो. त्या त्या परिसरातील पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांकडेच येथील पोलिस चौकीची जबाबदारी असते. काही अनुचित प्रकार घडल्यास चौकीतील कर्मचारी तो प्रकार तात्काळ नियंत्रणात आणू शकतात. याविषयी अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम म्हणाले, सदर बाजार व कदीम जालना पोलिस ठाण्यातंर्गत ८ पोलिस चौक्या आहेत. या ठिकाणी दोन कर्मचारी असतात. काही गुन्हा घडल्यास येथील कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणतात.
पोलिस चौक्या बंद
By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST