वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रात चोऱ्या व गुन्हे रोखण्यासाठी एमआयडीसी पोलीस प्रशासनाने कारखान्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षारक्षकांनी दक्ष राहावे, यासाठी उद्योजक व सुरक्षा एजन्सीला नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला आहे.वाळूज औद्योगिक परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या व गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारखान्यातील किमती ऐवज तसेच कामगारांच्या दुचाकी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत.या परिसरातील अनेक कारखान्यांत सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावीपणे उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गुन्हेगारी कारवाया वाढत चालल्या आहेत. चोरी व गंभीर स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी कारखान्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीच्या दर्शनी भागात तसेच पाठीमागील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रात सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या सुरक्षा एजन्सीकडे संबंधित सुरक्षारक्षकांची पुरेशी माहिती नसल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. संबंधित सुरक्षा एजन्सीचालकही रात्रीच्या वेळी गस्त घालत नसल्यामुळे सुरक्षारक्षक निर्धास्त राहत असल्यामुळे चोरीच्या घटना वाढल्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.सुरक्षितेच्या दृष्टीने संबंधितांनी पुरेशा उपाययोजना न केल्यामुळे चोऱ्या तसेच गंभीर स्वरू पाचे गुन्हे करून गुन्हेगार फरार होतात. त्यामुळे या गुन्हेगारांचा शोध लावताना पोलिसांची दमछाक होत आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांची मोहीम
By admin | Updated: August 20, 2014 01:00 IST