पोलिसांनी सांगितले की, अरुण मजुरी काम करतो. त्याला दारूचे व्यसन जडले आहे. तो रोज दारू पिऊन घरी जातो आणि कुटुंबातील नातेवाइकांना शिवीगाळ, मारहाण करतो. रविवारी रात्री दारूच्या नशेत तो वडिलांना शिवीगाळ करू लागला. यामुळे तुला पोलिसांत देतो, असे त्याला सांगून वडील पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. यानंतर मी आत्महत्या करतो, असे सांगून अरुणने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. ही बाब नातेवाइकांनी पोलिसांना फोन करून कळविली. गस्तीवरील पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पवार, होमगार्ड ओळेकर यांनी तात्काळ अरुणच्या घरी धाव घेतली. तेव्हा दरवाजा ठोठावूनही तो दार उघडत नव्हता. यावेळी पोलिसांनी तात्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा अरुणने दोर गळ्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसले. पोलिसांनी तातडीने दोर कापून त्याला खाली उतरविले. ताेपर्यंत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. अरुणला पोलिसांच्या वाहनांतून घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी सांगितले.
पोलिसांनी दार तोडून वाचवला गळफास घेतलेल्या तरुणाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:04 IST