नांदेड/हदगाव/मुखेड : काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, विद्यमान आमदार त्या-त्या मतदारसंघात उमेदवार असतील अशी शक्यता आहे़ मात्र नांदेड दक्षिण, हदगाव अन् मुखेडमध्ये पक्षांतर्गत स्पर्धकांचा सामना आमदारांना करावा लागत असल्याचे चित्र आहे़ मंगळवारी टिळक भवनात झालेल्या मुलाखतीसाठी हदगावमधून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर पोहचले नाहीत़ परंतु तुल्यबळ स्पर्धक असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधरराव पाटील चाभरेकर मुलाखतीला होते़ तसेच अल्पसंख्यांक सेलचे जाकीर चाऊस यांनीही मुंबईतील मुलाखतीला हजेरी लावून आपला दावा केला आहे़ कार्यकर्ता व विविध पदांवर राहून केलेले काम, यापूर्वीच्या उमेदवारांचा निष्ठेने केलेला प्रचार आदी मुद्दे मांडून आपण सरस असल्याचे दोहोंनी पक्षश्रेष्ठींसमोर सांगितले़ २००९ मध्ये पक्षाने माधवराव पाटील जवळगावकर यांना संधी दिली़ त्यावेळी १५ वर्षे आमदार राहिलेल्या बापूराव पाटील आष्टीकरांची नाराजीही पक्षाने घेतली़ सध्याच्या स्थितीत तालुक्यामध्ये काँगे्रसमध्ये फोडाफोडीचे राजकारण झाल्याची चर्चा आहे़ मनाठा सर्कल, निवघा सर्कल, तामसा सर्कल व हदगाव आदी ठिकाणी काँग्रेसचे दोन गट सक्रीय झाले आहेत़ त्याचवेळी पैसेवाल्यांना कामे मिळाली़ हाडाचे कार्यकर्ते दूर झाले, अशी ओरडही दबक्या आवाजात सुरू आहे़ त्यातच अनिल पाटील, गंगाधर पाटील, जाकेर चाऊस, बाबुराव पाथरडकर, प्रभाकरराव देशमुख आदी मंडळी नाराज असल्याचे बोलले जाते़ त्यामुळेच चाभरेकरांचा दावा चर्चेत आला असून, त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विविध विभागाचे सभापती म्हणून केलेल्या कामांवर चर्चा होतांना दिसत आहे़ तर अल्पसंख्यांक सेलचे जाकेर चाऊस हे वक्तृत्व व कार्यशैलीमुळे मतदारसंघात परिचित आहेत़ त्यांनी अनेक आंदोलने केली असून अल्पसंख्यांक समाजाला उमेदवारी दिली जावी, असा त्यांचा दावा आहे़ मुखेडमध्ये हणमंत पाटील बेटमोगरेकरांना काँग्रेसने संधी दिली होती़ परंतु मतदारसंघातील अनेक ज्येष्ठ, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर असून पक्षांतर्गत स्पर्धा करणाऱ्यांना संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे़ राजन देशपांडे यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून भाजपातून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना पदे दिली़ त्यामुळेच व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, शेषेराव चव्हाण यांचे उमेदवारांच्या यादीत नाव कार्यकर्त्यांकडून घेतले जात आहे़ गोजेगावकर ४० वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत़ मुक्रमाबाद, जाहूर, बाऱ्हाळी, मुखेड शहरात त्यांच्या नावाला वलय आहे़ या भागातील हटकर, लिंगायत, मराठा, मुस्लिम, दलित समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे पदाधिकारी सांगतात़ माजी आमदार घाटे यांनी यापूर्वी मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे़ त्यामुळे पक्षांतर्गत चुरस निर्माण झाली आहे़ नांदेड दक्षिण मतदारसंघातही आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या नावाला थेट विरोध नसला तरी अल्पसंख्यांक समाजाला उमेदवारी द्यावी, असा मजबूत सूर आहे़ महापौर अब्दूल सत्तार यांच्या उमेदवारीची चर्चा झाली असली तरी ते टिळक भवनातल्या मुलाखतीला गेले नव्हते़ मात्र आमदारांशी शाब्दिक संघर्ष झालेले दिलीप कंदकुर्ते तसेच एम़झेड़ सिद्दीकी, मसूद खान यांच्यासह अन्य काही जणांनी मुलाखती दिल्याची माहिती आहे़ याउलट काँग्रेसचे मतदारसंघ असलेल्या नांदेड उत्तर, भोकरमध्ये पक्षांतर्गत रस्सीखेच दिसत नाही़ नायगाव, देगलूर मतदारसंघातही काँग्रेस पक्षांतर्गत स्पर्धेला वाव सध्या तरी दिसत नाही़ (प्रतिनिधी/वार्ताहर)
पोकर्णा, जवळगावकर, बेटमोगरेकरांना पक्षांतर्गत स्पर्धा
By admin | Updated: August 20, 2014 00:17 IST