येणेगूर : बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी पालकांकडून प्रत्येकी शंभर रुपये वसूल करण्यात येत असल्याचा प्रकार येणेगूर गावात आठवड्यापासून सुरु आहे. यामुळे मोफत आधारकार्ड प्रक्रियेत अंगणवाडी कार्यकर्ती व संबंधित आॅपरेटरकडून लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या शासनाच्या धोरणानुसार बालकांचे आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया गावात सुरु आहे. मोफत प्रक्रियेला अंगणवाडी कर्मचारी, कार्यकर्ती व आॅपरेटर खो देत प्रत्येक बालकांच्या पालकांकडून प्रत्येकी शंभर रुपये वसूल करीत असल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावात एकूण पाच ते सहा अंगणवाड्या कार्यरत आहेत. प्रत्येक अंगणवाडीत बालकांची संख्या लक्षणीय आहे. बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीत मोठी गर्दी आहे. नेमका या गर्दीचा फायदा घेत कर्मचारी आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत. यासंदर्भात येथील राष्ट्रवादीचे इरफान उजळंबे यांनी आधारला पैसे का घेता अशी विचारणा केली असता, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी थातूर मातूर उत्तर दिले. पालकांची लुबाडणूक होत असल्याने संबंधित खाते प्रमुखांनी चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालकांतून होत आहे. यासंदर्भात मुरुम विभागीय बालविकास प्रकल्प अधिकारी ए.आर. बागल यांच्याशी संपर्क साधला असता, बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी नागरिकांनी कोणालाही पैसे देवू नयेत. ही प्रक्रिया मोफत आहे. पैसे घेणाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
आधारकार्डसाठी लुबाडणूक
By admin | Updated: April 9, 2015 00:12 IST