खुलताबाद : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने तालुका प्रशासनाने लसीकरण व तपासणी मोहीम सुरू केली आहे. तालुक्यात आजरोजी ८० बाधित रुग्ण असून त्यांच्यावर खुलताबाद कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यात वेरुळचे २१, तर गोळेगावच्या १८ बाधितांचा समावेश आहे.
खुलताबाद तालुक्यात आतापर्यंत (गेल्यावर्षीपासून) ८५० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील वेरूळ, बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचबरोबर खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.
खुलताबाद तालुक्यातील ७४ गावांपैकी ६२ गावे कोरोनाबाधित असून १२ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे. तालुक्यातील सरकारी दवाखाने व ग्रामीण रुग्णालयांत एक्सरे, सिटी स्कॅन, ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सोय नसल्याने गंभीर रुग्णांना औरंगाबादला रेफर करण्यात येते. त्याचबरोबर सरकारी १०८ रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने खासगी वाहनाने रुग्णांना औरंगाबादला न्यावे लागते. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: ढेपाळली असून सरकारी दवाखाने रेफर सेंटर बनले आहेत.
चौकट
वेरुळ गावचा ऑन दि स्पॉट रिपोर्ट
जगप्रसिद्ध वेरुळ गावात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. गावाची लोकसंख्या ७५०० इतकी असून कोरोनाचा पहिला रुग्ण २४ जून २०२० रोजी आढळून आला होता. गावात आतापर्यंत एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वेरुळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथे कोरोना चाचणीसह उपचार केले जातात. मात्र कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी रुग्णांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठविले जाते. सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना खुलताबाद कोविड सेंटरला हलविले जाते. गावात २२ एप्रिल रोजी १६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
वेरुळ हे धार्मिक क्षेत्र व पर्यटनस्थळ असल्याने गावात व्यापारी व दुकानदारांची संख्या जास्त आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प दिसले. तसेच कोरोनामुळे गावात भीतीचे वातावरण दिसले.