सिल्लोड : येथील देवगिरी नागरी पतसंस्थेच्या पिग्मी एजंटने खातेदारांच्या पासबुकवर नोंदी करून पैसे घेतले खरे; मात्र ते पतसंस्थेत न भरता स्वत: वापरले. याप्रकरणी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाने सिल्लोड शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यात सहा लाख ९३ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शाखा व्यवस्थापक देवीदास बाबुराव जाधव (रा. सिल्लोड) यांनी सांगितले की, सिल्लोड शहरातील देवगिरी नागरी पतसंस्था येथे पिग्मी एजंट म्हणून जयेश बालकिशन श्रीरंगम (रा. सिल्लोड) हा काम करीत होता. तो शहरात दररोज पतसंस्थेच्या खातेदारांकडून पासबुकवर नोंदी करून रक्कम जमा करीत असे; पण यापैकी काही रक्कम पतसंस्थेत जमा न करता त्याने ती स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. यात ६ लाख ९३ हजार ३२१ रुपयांचा अपहार झाला व पतसंस्थेची फसवणूक झाली. याप्रकरणी सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)
पिग्मी एजंटने परस्पर लाटले खातेदारांचे पैसे
By admin | Updated: December 23, 2014 00:17 IST