लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांची उचलबांगडी करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात रूजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी नुकतेच दिले आहेत. वाढती गुन्हेगारी व रखडलेल्या तपासांसह इतर महत्त्वपूर्ण कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांची बदली करण्यात आली आल्याचे समजते. लोकमतने वृत्त प्रकाशित करून पेठ बीड पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर आणला होता.मागील काही दिवसांपासून पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार आरोपी खुलेआम फिरत होते. तसेच गोळीबार, छेडछाड, खून, अत्याचार, बनावट नोटासह इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. याबाबत पोलीस अधीक्षकांकडून वारंवार मेमो देऊनही जाधव यांच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. एकूण ठाण्याच्या कामगिरीवर वरिष्ठ अधिकारी नाराज होते. त्यातच मागील काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात जाधव अपयशी ठरले होते.याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून पेठबीड पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर आणला होता. याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली. मंगळवारी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी जाधव यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागेवर पदोन्नतीवर आलेले बडे यांना नियुक्ती दिली. त्यांनी पदभारही स्वीकारला आहे.
पेठबीडचे पोलीस निरीक्षक जाधव यांची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:54 IST