औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने हळूहळू अनलॉक अंतर्गत लग्नकार्य तसेच मंगल कार्यालये सुरू केली. मात्र, नागरिक कोरोना नियमांचे पालन न करता लग्न करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे आता कोणत्याही लग्नासाठी नागरिकांना महापालिका आणि संबंधित पोलीस ठाण्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेता लग्न लावल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासन आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.
कोरोना आजाराची दुसरी लाट येणार असल्याचे शासनाने यापूर्वीच सांगितले आहे. नागरिकांनी कोरोनासाठी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे, असे अनेकदा सांगितले. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे प्रशासनाला निदर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता थेट कारवाईचा बडगा उगारण्याचा सुरुवात केली आहे. आजही लग्नासाठी फक्त पन्नास नागरिकांना परवानगी असताना पाचशे ते एक हजार नागरिकांपर्यंत आमंत्रण दिल्या जात आहे. मंगल कार्यालय मालक यावर कोणताही आक्षेप घेण्यास तयार नाहीत. दोन दिवसांपूर्वी शहरातील सर्व मंगल कार्यालय चालकांची महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन शेवटचे अल्टिमेटम दिले. त्यानंतर गुरुवारी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नवीन आदेश जारी केले.
औरंगाबाद शहरात लग्न करायचे असेल तर आता संबंधितांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलीस ठाण्याची परवानगी देखील अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात पालिकेच्या प्रशासकांनी नुकतेच आदेश जारी केले आहेत. हे आदेश १ डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. या आदेशानुसार खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
लग्नासाठी परवानगी आवश्यक
लग्नासाठी पन्नास व्यक्तींची मर्यादा देण्यात आली आहे. लग्न समारंभाचे आयोजन करताना संबंधितांना आता महापालिकेची आणि पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पन्नास व्यक्तींची मर्यादा काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्याला मास्कची सक्ती करण्यात आली आहे. सुरक्षित वावर, सॅनिटायझरचा वापर देखील सक्तीचा करण्यात आला आहे. लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी काहीजण जरी विनामास्क आढळले तरी मंगल कार्यालय चालकावर कारवाई केली जाणार आहे. पहिल्यावेळी पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे, दुसऱ्यांदा मंगल कार्यालय सात दिवसांसाठी सील केले जाणार आहे. त्यानंतर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.