बिलोली :मांजरातील गंजगाव वाळू घाटातील उर्वरित वाळू उपसा सुरू करण्यासाठी आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे़ दरम्यान जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आकारलेल्या ५८ लाख रुपये रकमेला ही स्थगिती दिली आहे़ यापूर्वी औरंगाबाद खंडपीठानेही बिलोली तहसीलदारांच्या कार्यवाहीवर ताशेरे ओढले होते़गंजगाव वाळू घाटांवर १२ जून २०१३ रोजी तहसीलदार राजकुमार माने यांनी भेट देवून तपासणी केली़ जास्तीचा वाळू उपसा झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला़ तहसीलदारांच्या अहवालानुसार ५८ लाख रुपये दंड आकारण्यात येवून वाळू उपसा बंद करण्यात आला़ गौण खनिज विभागाने ठरवून दिलेल्या वाळू पात्रातून ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत वाळू उपसा करण्याची परवानगी होती़ पण मुदतपूर्व वाळू घाट बंद करण्यात आला़ बिलोली महसूल विभागाने केलेल्या दंडत्मक व फौजदारी कार्यवाही प्रकरणाच्या विरोधात ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली व प्रशासनाने एकतर्फी कार्यवाही केल्याचे नमुद केले़ खंडपीठाने महसूल आयुक्ताकडे पुन:श्च वळू उपशाची परवानगी घ्यावी त्याचप्रमाणे दंडात्मक रकमेला स्थगिती दिली़ २३ जुलै रोजी ठेकेदार वेमुलपल्ली मुरलीमोहन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होवून उपआयुक्त जितेंद्र पापलवार यांनी पुन:श्च वाळू उपशाला परवानगी दिली़ त्याचप्रमाणे ७ जुलै २००७ च्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली़ आता ३० सप्टेंबरपर्यंत वाळू उपसा सुरू राहणार आहे़ मागच्या महिनाभरापासूनच सर्व वाळू घाट बंद होते़ (वार्ताहर)
गंजगाव वाळू उपशाला परवानगी
By admin | Updated: July 26, 2014 01:07 IST